जिंतूर : करपरा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा करून वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून घेऊन जाताना तलाठी शेख खलील. pudhari photo
परभणी

Sand mining violation : अवैध वाळूचे ट्रॅक्टर तलाठ्याने कारवाई न करता सोडले

अर्थपूर्ण तडजोडीची चर्चा रंगली; संबंधितावर सखोल चौकशीसाठी ग्रामस्थांचे प्रशासनास निवेदन सादर

पुढारी वृत्तसेवा

जिंतूर : तालुक्यातील करपरा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडूनही संबंधित तलाठ्याने कोणतीही कायदेशीर कारवाई न करता तो परस्पर सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे महसूल प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

करपरा नदीपात्रातील वाळू साठ्याचा अद्याप लिलाव झालेला नसतानाही मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू करण्यात आलेला आहे. मंगळवारी (दि.27) दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास दुधगावचे तलाठी शेख खलील हे कौडगाव शिवारात आले असता, कौडगाव येथून दुधगावकडे अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तलाठ्यांनी सदर ट्रॅक्टर थांबवून चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता कोणताही परवाना आढळून आला नाही.

ट्रॅक्टर अवैध वाळूची वाहतूक करताना आढळून आल्यानंतर तलाठी शेख खलील यांनी स्वतः त्या ट्रॅक्टरवर बसून तो दुधगाव बायपास रस्त्यापर्यंत आणला. मात्र त्या ठिकाणी ट्रॅक्टर मालक व चालक आल्यानंतर कथितरीत्या अर्थपूर्ण बोलणी झाल्यानंतर तलाठ्यांनी कोणतीही दंडात्मक किंवा जप्तीची कारवाई न करता ट्रॅक्टर तसाच सोडून दिल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

या प्रकारामुळे गावात आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात असून, महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, अवैध वाळू उपशावर कठोर कारवाई होत नसल्याने अशा प्रकारांना खतपाणी मिळत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत असून, प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

चौकशी करून कारवाई करू : तहसीलदार

बुधवारी (दि.28) सकाळी जिजाराव दिनकर नागरे, मंगेश सुभाष नागरे, मदन विश्वनाथ नागरे, रामप्रसाद सदाशिव नागरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी तहसीलदार शीतल कच्छवे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्यांनी तलाठी ट्रॅक्टरवर बसलेले छायाचित्रे सादर करत संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. याबाबत तहसीलदार कच्छवे यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT