गंगाखेड: स्वातंत्र्याची ७७ वर्षे उलटली, विकासाच्या घोषणांचा पाऊस पडला, पण तालुक्यातील टाकळवाडीच्या नशिबी मात्र चिखलाचा रस्ता कायम आहे. केवळ दोन किलोमीटरच्या पक्क्या रस्त्याअभावी होणारी फरफट आणि प्रशासकीय अनास्थेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर रविवारी (दि. १७ ऑगस्ट) अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावरील चिखलात बसून आंदोलन करत सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाने गावातील भीषण वास्तवाची दाहकता पुन्हा एकदा समोर आणली आहे.
रविवारी सकाळी आठच्या सुमारास गावातील महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती एकत्र जमले. यावेळी पुरूषांनी अर्धनग्न होऊन, जिखलात उतरत प्रशासकीय उदासीनतेचा निषेध करत ग्रामस्थांनी चिखलातच बसून ठिय्या मांडला. या आंदोलनात दिव्यांग दत्तराव डोईफोडे यांच्यासह महिलांचा लक्षणीय सहभाग होता, जो त्यांच्या दैनंदिन त्रासाची तीव्रता दर्शवतो. "रस्ता नाही, तर मत नाही," अशा घोषणा देत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.
टाकळवाडी हे गाव गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. गावापासून मुख्य रस्त्यापर्यंतचे अंतर केवळ दोन किलोमीटर आहे, मात्र हा रस्ता अनेक वर्षांपासून कच्चा आणि चिखलमय आहे. ग्रामस्थांच्या मते पावसाळ्यात रुग्ण किंवा गर्भवती महिलेला दवाखान्यात नेणे म्हणजे एक दिव्य असते. वेळेवर वाहन न मिळाल्याने अनेकांना जीव धोक्यात घालावा लागतो. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज चिखलातून वाट काढावी लागते, ज्यामुळे अनेकदा त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. रस्त्याअभावी अनेक कुटुंबे गाव सोडून शहरात स्थलांतरित झाली आहेत, ज्यामुळे गाव ओस पडू लागले आहे.
ग्रामस्थांचा मुख्य रोष हा राणीसावरगाव ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींवर आहे. "ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे, पण येथील पुढारी फक्त निवडणुकीपुरते गावात येतात आणि मतांचा जोगवा मागतात. एकदा निवडणूक झाली की आमच्या समस्यांकडे ढुंकूनही पाहत नाहीत," अशी संतप्त प्रतिक्रिया समाजसेवक सोपानराव नागरगोजे यांनी दिली. रस्त्यासाठी अनेकदा निवेदने देऊन, विनंत्या करूनही निधी उपलब्ध होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
टाकळवाडीचे हे आंदोलन केवळ एका रस्त्यापुरते मर्यादित नाही, तर ते विकासाच्या गप्पा आणि ग्रामीण भागातील वास्तव यातील दरी दाखवणारे आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही जर नागरिकांना मूलभूत हक्कांसाठी चिखलात उतरून आक्रोश करावा लागत असेल, तर 'विकास' या शब्दावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. या आंदोलनानंतर तरी प्रशासन जागे होणार का आणि टाकळवाडीच्या नशिबी पक्का रस्ता येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.