Parbhani sugarcane crop pest pudhari photo
परभणी

Parbhani sugarcane crop pest : फुलकळस शिवारात ऊसावर पिठ्या ढेकूण, पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव

पावसाच्‍या प्रदीर्घ खंडामुळे ऊसउत्‍पादक शेतकरी दुहेरी संकटात; कीड नियंत्रणासह नुकसान भरपाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

ताडकळस : ताडकळस जवळील फुलकळस (ता. पूर्णा) शिवारातील ऊस पिकावर पिठ्या ढेकूण व पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. मागील सुमारे २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आधीच अडचणीत असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर किडीच्या प्रादुर्भावाचे नवे संकट उभे राहिले आहे.

पूर्णा तालुका परिसरातील अनेक ऊस क्षेत्रांत किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून, तो वाढल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. उसाची वाढ मोठी झाल्याने पारंपरिक पद्धतीने फवारणी करणे अवघड ठरत असून, किड नियंत्रणासाठी ड्रोनद्वारे फवारणीचा पर्याय वापरावा लागत आहे. मात्र, त्यासाठी अतिरिक्त खर्च होत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढत आहे.

किडीचा प्रादुर्भाव वेळीच नियंत्रणात न आल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असून, कृषी विभागाने बाधित क्षेत्राची सातत्याने पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, तसेच झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून मदतीबाबत शासनस्तरावर निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, सहायक कृषी अधिकारी बालाजी अवचार यांनी फुलकळस परिसरातील प्रादुर्भावग्रस्त ऊस क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांना किड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या शिफारशीनुसार ड्रोनद्वारे फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला असून, ॲसिफेट ५० टक्के व इमिडाक्लोप्रिड १.८ टक्के एसपी प्रति १० लिटर पाण्यास ५० ग्रॅम अथवा क्लोरीपायरीफॉस प्रति १० लिटर पाण्यास २० मिली प्रमाणात फवारणी करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रादुर्भावग्रस्त ऊस क्षेत्राची नियमित पाहणी करावी, किड नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे, नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करावे, ड्रोन फवारणीचा वाढता खर्च लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशा शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

कीडीच्‍या प्रादुर्भावाने ऊसउत्‍पादक हैराण, कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची अपेक्षा

  • २५ दिवसांपासून पाऊस नसल्याने ऊस पिकावर परिणाम होत आहे. त्यातच पिठ्या ढेकूण व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कृषी विभागाने तातडीने योग्य मार्गदर्शन करावे - आकाश तुकाराम शिराळे.

  • उसाची वाढ मोठी असल्याने पारंपरिक फवारणी करणे कठीण आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी करावी लागत असून त्यासाठी अतिरिक्त खर्च होत आहे .- सुधाकर रामराव शिराळे.

  • पावसाचा दीर्घ खंड आणि वाढता किडीचा प्रादुर्भाव यामुळे ऊसउत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. बाधित क्षेत्राची पाहणी करून योग्य मार्गदर्शन मिळावे - केदार खुशालराव कुबडे.

  • प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत व नुकसानभरपाई द्यावी.- मधुकर नावकीकर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT