Parbhani News : विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदनास विरोध File Photo
परभणी

Parbhani News : विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदनास विरोध

नातेवाईकांचा ग्रामीण रुग्णालयात ठिय्या

पुढारी वृत्तसेवा

Suspicious death of a married woman, opposition to autopsy until the accused are arrested

चारठाणा, पुढारी वृत्तसेवा येथील ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सावरगाव तांडा येथील २९ वर्षीय विवाहितेचा मृतदेह शनिवारी (दि.५) सकाळी गावातील विहिरीत आढळला. या महिलेच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त होत असल्याने नातेवाईकांनी दवाखान्यात एकत्र येत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही असा पवित्रा घेतला.

जनाबाई मधुकर पवार (वय २९, रा. चिंचोली काळे, सध्या रा. सावरगाव तांडा) असे मयत महिलेचे नाव आहे. तिच्या मृत्यूबाबत पतीसह सासरच्या मंडळींवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात ठिय्या देत आरोपींना अटक होईपर्यंत शवविच्छेदनास ठाम विरोध दर्शविला.

परिणामी सकाळी १० वाजेपासून दुपारी ५ पर्यंत रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जनाबाई यांचा विवाह सावरगाव तांडा येथील मुरलीधर पवार यांच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. मृतदेह विहिरीत आढळल्याने हा अपघात आहे की, आत्महत्या की हत्या याबाबत शंका व्यक्त होत आहे.

पती आणि सासरच्यांनी त्रास देत जनाबाईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, त्यांनी आर-ोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास व शवविच्छेदनास स्पष्ट नकार दिला.

घटनेची माहिती मिळताच चारठाणा ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील अंधारे, पीएसआय विठ्ठल राठोड यांच्यासह गुन्हे शाखेचे हवालदार जिया खान पठाण, चौधरी, वासलवार, मधुकर राठोड, घोगरे, घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न केला असला तरी ते भूमिकेवर ठाम होते. पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून शवविच्छेदनासाठी नातेवाईकांची परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT