Parbhani Political News : सुरेश वरपुडकरांचा उद्या भाजपात जाहीर प्रवेश  File Photo
परभणी

Parbhani Political News : सुरेश वरपुडकरांचा उद्या भाजपात जाहीर प्रवेश

कार्यकर्ते - समर्थक आज मुंबईला रवाना होणार

पुढारी वृत्तसेवा

Suresh Varpudkar to join BJP tomorrow

परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या राजकारणात मागील चार दशकापासून ठसा उमटविणाऱ्या माजी राज्यमंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन सुरेश वरपुडकरांच्या भाजपा प्रवेशाचा मुहुर्त निश्चित झाला असुन उद्या मंगळवार २९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वरपुडकर आपल्या शेकडो कार्यकर्ते समर्थकांसह भाजपामध्ये रितसर प्रवेश करणार आहेत.

२०२४च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या. यामुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्येही चलबिचल सुरू होती. परंतु साहेब या आदरयुक्त बिरुदावलीने जिल्हाभरात परिचित असलेल्या सुरेश वरपुडकरांच्या अंतरमनाचा थांगपत्ता कुणाला लागत नव्हता.

पक्ष प्रवेशाच्या चर्चा व्हायच्या आणि त्या काही काळानंतर थंडावल्या जायच्या. असेच सत्र सुरू होते. मागील चार दशकाच्या राजकारणात पाच वेळा आमदारकी आणि एक वेळा खासदारकी मिळविलेल्या सुरेश वरपुडकरांची जिल्हाभरात लोकनेता म्हणुन ओळख असुन कार्यकर्त्यांचे मोहळ त्यांच्याकडे आहे. याचमुळे साहेबांचं चाललंय काय ? अशी उत्सुकता कार्यकर्त्यांना होती.

काही दिवसापुर्वी त्यांनी तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या चेअरमन व निकटवर्तीय कार्यकर्त्यांना जेवनासाठी आमंत्रीत केले होते, परंतु या कार्यक्रमात कुठलेही राजकिय भाष्य त्यांनी केले नव्हते. त्यानंतर काही दिवस उलटल्यानंतर सुरेश वरपुडकरांनी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे भेट घेतली.

विशेषतः या भेटीच्या वेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांचीही उपस्थिती होती. बावनकुळे वरपुडकर यांच्या भेटीचे छायाचित्र झळकल्यानंतर सुरेश वरपुडकरांच्या भाजपा पक्ष प्रवेशाची चर्चा अधिकच जोर धरु लागली होती. कार्यकर्ते - समर्थक आपापल्या पद्धतीने कुठल्या तारखेला प्रवेश होणार असा अनुमानही लावत होते. अखेर सुरेश वरपुडकरांच्या पक्ष प्रवेशाचा मुहुर्त निश्चित झाला असुन उद्या २९ जुलै रोजी ते मुंबई येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये रितसर प्रवेश करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT