सोनपेठ: सोनपेठ तालुक्यातील खपाटपिंप्री तांडा येथे ऊसतोड मजुर पुरविण्याच्या करारासाठी घेतलेले १८ लाख रुपये परत द्या, अशी मागणी करत कारखान्याच्या लोकांनी एका व्यक्तीला जबरदस्तीने उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली. वडिलांना उचलून नेल्याने आणि पैशांची चिंता डोक्यावर आल्याने, केवळ १६ वर्षीय मुलीने विषारी द्रव प्राशन करून जीवन संपवले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अनिल जाधव व इतरांनी निरानी साखर कारखाना, मुधोळ (जि. बागलकोट, कर्नाटक) यांच्याकडून ऊसतोड मजुर पुरविण्याच्या करारासाठी १८ लाख रुपये घेतले होते. करारानुसार मजुर पुरवता न आल्याने कारखान्याचे अधिकारी सतत धमक्या देत होते. अखेर कारखान्याच्या लोकांनी अनिल जाधव यांना जबरदस्तीने उचलून नेले आणि पैशासाठी मारहाण केली. या घटनमुळे चिंतेने त्रस्त असणाऱ्या त्यांच्या १६ वर्षीय मुलीने विषारी द्रव प्राशन करून जीवन संपवले आहे, अशी तक्रार तिची आई ज्योती जाधव हिने केली आहे.
वडिलांचा ७ जुलै रोजी मुलीला फोन आला. यावेळी त्यांनी मुलीला "मला काहीही करून सोडव," असे सांगितले. यामुळे माया तणावात आली. "आमच्या शिक्षणाचे काय होईल, वडीलांना सोडविण्यासाठी पैसे कोठून आणणार, आता जगून काय फायदा," असे ती सतत म्हणत होती. याच विवंचनेत ती होती. १५ जुलै रोजी मायाने विषारी द्रव प्राशन केला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शेतकी अधिकारी हुकीरे आणि वसुली अधिकारी महादेव बिराजदार (निरानी साखर कारखाना) यांच्यावर सोनपेठ पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा २७ जुलै रोजी दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.