शॉर्टसर्किटमुळे ऊस जळाला, शेतकऱ्याचे २ लाखाचे नुकसान  File Photo
परभणी

शॉर्टसर्किटमुळे ऊस जळाला, शेतकऱ्याचे २ लाखाचे नुकसान

पुर्णेतील कान्हेगाव शिवारातील घटना

पुढारी वृत्तसेवा

पुर्णा, पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील फुकटगाव येथील एका शेतक-याचा कान्हेगाव शिवारातील एक एकर सुरु ऊस शॉटसर्किटमुळे आज (शनिवार) दुपारी जळाला. यात शेतक-याचे पीक नष्ट होणार असून संभाव्य ७० टन उत्पादन बुडाल्यामुळे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील रहिवासी शेतकरी भिमराव केरबा रणवीर यांची कान्हेगाव शिवारात गट क्रमांक ९१ मध्ये जमीन आहे. त्यांनी मागील रब्बी हंगाम २०२४ मध्ये ९ व्या महिन्यात ऊसाची लागवड केली आहे. सहा महिण्यांच्या काळात ऊसाची चांगली वाढ होवून पीक जोमदार अवस्थेत होते. यातच शेतातून गेलेल्या महावितरणच्या ११ केव्ही लोंबकळलेल्या विद्यूत तारात १९ एप्रिल शनिवार रोजी दुपारी अचानक शॉटसर्किट होवून ज्वालेची (जाळ) ठिणगी ऊसात पडली. ऊस पिकात तृण नाशक फवारणी करुन वाळलेला काडीकचरा व पाचटीने पेट घेतला आणि संपूर्ण एक एकर ऊस जळून होरपळून गेला.

हे जळालेले ऊस पीक पून्हा पूर्वरत होवूच शकणार नसल्याने पीक वाया गेले आहे. आगामी काळात ७० टन संभाव्य ऊस उत्पादन बुडाल्यामुळे शेतकऱ्याचे २ लाख रुपये नुकसान झाले आहे. सदर शेतकरी आर्थिकदृष्ट्या मागास असल्यामुळे त्याला दु:ख सहन न झाल्यामुळे ही घटना घडली तेव्हा तो धायमोकलून रडत होता. दरम्यान, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ११ केव्ही विद्यूत लाईनची तारा लोंबकळलेल्या असल्याने शॉटसर्किट घडले. अशा घटना पूर्णा तालूका परिसरात या आधी अनेक ठिकाणी घडून शेतकऱ्यांचे उभे ऊस पिक जळून खाक झाले आहे. तरीही निर्ढावलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन विद्यूत खांब व तारा सरळ केल्याच नाहीत. शेतकरी भिमराव रणवीर यांना महावितरण व महसूल खात्यामार्फत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT