एसटी सवलतधारकांनो सावधान! आता स्मार्ट कार्डशिवाय प्रवास नाही pudhari photo
परभणी

ST bus smart card rule : एसटी सवलतधारकांनो सावधान! आता स्मार्ट कार्डशिवाय प्रवास नाही

एनसीएमसी अनिवार्य; 199 रुपयांत मिळणार ‌‘रुपये ऑन द गो‌’ सुविधा

पुढारी वृत्तसेवा

परभणी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सवलतधारक प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि अपंग प्रवाशांना मिळणारी सवलत पूर्णपणे डिजिटल केली जाणार असून, त्यासाठी ‌‘एनसीएमसी‌’ स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. भविष्यात या कार्डशिवाय सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गैरवापर टाळण्यासाठी डिजिटल शस्त्र

सध्या अनेक सवलतींचे पास हस्तलिखित स्वरूपात आहेत, ज्यामुळे वार्षिक किलोमीटर मर्यादेचे उल्लंघन किंवा गैरवापर होण्याची शक्यता असते. ही गळती रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी महामंडळाने हे नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड (रुपये ऑन द गो) आणले आहे. यामुळे प्रवासाची अचूक नोंद होण्यास मदत होईल.

हे स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी प्रवाशांना केवळ 199 रुपये शुल्क भरावे लागेल. हे कार्ड आपल्या जवळच्या बसस्थानकावरून प्राप्त करता येईल. अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग आणि विद्यार्थी अशा सर्वच लाभार्थ्यांसाठी हे कार्ड बंधनकारक असेल.

राज्य परिवहन महामंडळाच्या या उपक्रमाला प्रवाशांनी सहकार्य करावे आणि तातडीने आपले कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन परभणीचे विभाग नियंत्रक सचिन डफले आणि विभागीय वाहतूक अधिकारी संदीपकुमार साळुंखे यांनी केले आहे.

डिजिटल व्यवस्थेचे फायदे

  • सवलतींची अचूक नोंद आणि प्रभावी नियंत्रण.

  • प्रति प्रवास किलोमीटर मर्यादेचे काटेकोर पालन.

  • कागदविरहित, जलद आणि सुरक्षित व्यवहार.

  • एकाच कार्डचा वापर इतर वाहतूक सेवांसाठीही शक्य.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT