पूर्णा : येथील महाराष्ट्र शासन तालुका कृषी कार्यालयाअंतर्गत खरीप हंगामातील पेरणीसाठी ३९८ शेतकऱ्यांना २३२ क्विंटल सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. पूर्णा तालुक्यातील महाडीबीटीवर नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे वितरण शंभर टक्के अनुदानावर ५ वर्षीय आतील सुधारीत केडी एस ७५३ (महाबीज) बियाणे वाटप करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी दिली.
पूर्णा तालुक्यासाठी कृषी विभागाच्या वतीने एकूण २९० क्विंटल सोयाबीन बियाणे मंजूर करण्यात आले आहेत . त्या पैकी ३१ मे पर्यंत महाडीबीटीवर नोंदणी केलेल्या प्रथमतेनुसार पहिला टप्पा यादी ३९८ शेतकऱ्यांना २३२ क्विंटल सोयाबीन बियाणे वितरीत करण्यात आले. शेवट २ जून पर्यंतच्या वाढीव तारीख नोंदणीकृत शेतकऱ्यापैकी अजून दुसरा टप्पा म्हणून मेसेज प्राप्त मंजूर शेतकऱ्यांना ५८ क्विंटल सोयाबीन बियाणे वाटप करण्यात येणार आहे.
मंजूर शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत जमीन क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी ७५ किलो मर्यादेपर्यंत सोयाबीन बियाणे मंजूर होते. त्या पैकी गोणी फोडून देता येत नसल्यामुळे एक हेक्टर मंजुरीसाठी महाबिज महामंडळाच्या केडीएस ७५३ या वाणांच्या प्रति बॅग २२ किलोच्या ३ बॅग वाटप करण्यात आल्या.
जे शेतकरी कोरडवाहू व आर्थिक परिस्थितीने गरीब आहेत. त्यांच्यासाठी निकष लावून नोंदणी पध्दत राबविणे गरजेचे होते. परिणामी ऐन पेरणीच्या वेळी त्यांना आडते, कृषी दुकानदार तथा सावकाराकडे व्याजाने पैसे काढून पेरणी करण्याची वेळ येते. तर आडते, कृषी दुकानदार हंगामापर्यंत उधारीवर बियाणे खते देण्यासाठी स्पष्ट नकार देतात, त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करण्यास मोठी अडचणी येतात.