Sant Rangnath Maharaj emblem File Photo
परभणी

Parbhani News: सोनपेठ नगर परिषदेच्या शासकीय कामांवर संत रंगनाथ महाराजांचे चिन्ह; ठराव मंजूर

सोनपेठ शहराच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेला अधोरेखित करणारा ऐतिहासिक ठराव सोनपेठ नगर परिषदेने मंजूर केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Parbhani News

सोनपेठ : सोनपेठ शहराच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेला अधोरेखित करणारा ऐतिहासिक ठराव सोनपेठ नगर परिषदेने मंजूर केला आहे. नगर परिषदेच्या सर्व शासकीय कामकाजात तसेच अधिकृत स्टॅम्पवर ब्र.भु. श्री संत रंगनाथ महाराज सोनपेठकर यांचे चिन्ह वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सोनपेठ शहराला आपल्या आध्यात्मिक परंपरेशी जोडणारी एक अधिकृत आणि हक्काची ओळख प्राप्त होणार आहे.

संत रंगनाथ महाराज हे सोनपेठच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे श्रद्धास्थान मानले जातात. त्यांच्या चिन्हाचा नगर परिषदेच्या अधिकृत कामकाजात समावेश करण्याचा निर्णय हा शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा सन्मान करणारा असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

हा महत्त्वपूर्ण ठराव पुढाकार घेऊन मांडून तो मंजूर करून आणल्याबद्दल नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांचे नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे सोनपेठ शहराच्या ओळखीला एक नवा आयाम मिळाला असून, शहराच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

नगर परिषदेच्या शासकीय पत्रव्यवहारासह अधिकृत स्टॅम्पवर संत रंगनाथ महाराजांचे चिन्ह वापरले जाणार असल्याने शहराच्या प्रशासनिक कामकाजातूनही सोनपेठची आध्यात्मिक ओळख अधोरेखित होणार आहे. या निर्णयाबद्दल संपूर्ण सोनपेठकरांमध्ये समाधानाचे वातावरण असून, “सोनपेठच्या अस्मितेला मिळालेला हा सन्मान आहे,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT