जरांगे यांच्या इशाऱ्यानंतरही परभणीत शिंदे यांचा मेळावा file photo
परभणी

Parbhani News : जरांगे यांच्या इशाऱ्यानंतरही परभणीत शिंदे यांचा मेळावा

घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Shinde's rally in Parbhani despite Jarange's warning

परभणी : पुढारी वृत्तसेवा परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा शेतकरी मेळावा न घेण्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी देऊनही हा मेळावा रविवारी पार पडला. शिंदे यांच्या आगमनापूर्वी घोषणाबाजी करणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिंदेंनी भाषणाला सुरुवात करताच मराठा आंदोलकांनी सुरुवातीलाच काळे झेंडे दाखवत आणि जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या. दरम्यान, शिंदे यांनी आपल्या भाषणात मराठा समाजाला न्याय देण्यासाठी महायुती सरकार काम करीत असल्याचे स्पष्ट केले.

परभणीचे खा. संजय जाधव यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. परंतु सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जरांगे यांनी आंदोलनस्थळावरूनच जाधव यांना मोबाईल करून मेळावा न घेण्याचा इशारा दिला. मेळावा घेण्याचा प्रयत्न झाल्यास आपण स्वतः परभणीकडे येणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. तेव्हा जाधव यांनी लोक मेळावास्थळी आलेले असताना मेळावा रद्द करणे शक्य नसल्याचे सांगितले. अंतरवालीत घोषणाबाजी झाली.

त्यामुळे मेळाव्याविषयी काहीसे संभ्रमाचे वातावरण होते. जाधव यांनी माध्यमांशी बोलतानाही मेळावा होणार ही ठाम भूमिका घेतल्यानंतर जरांगे मवाळ झाले. परभणीला जाईपर्यंत मेळावा होऊन जाईल, असे सांगत मेळावा रद्द न करण्याचा निर्णय घेतल्याने ही त्यांच्या राजकीय आयुष्यातील मोठी चूक ठरेल, असे सांगत आगामी काळात त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा जरांगे यांनी दिला. गोरगरीब मराठा जनतेने मतदान करून बंडू जाधव यांना निवडून दिले. त्यानंतर त्यांनी पक्ष बदलल्याने जनतेच्या मताचा अपमान झाला, असा आरोप जरांगे यांनी केला.

खा. जाधव यांचा आंदोलकांशी संवाद

जरांगे यांच्या आक्रमक पाक्रियानंतर अंतरवाली, परभणीत पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मराठा समाजाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांशी खा. संजय जाधव यांनी स्वतः थांबून संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांच्या मागण्यांबाबत चर्चा करताना खा. जाधव यांनी मनोज जरांगे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशी घोषणा देत हात उंचावून आंदोलनकर्त्यांसोबत घोषणेत सहभाग घेतला. मात्र, काहीवेळ संवाद झाल्यानंतर खा. जाधव सभास्थळाकडे रवाना झाले आणि त्यानंतरही आंदोलकांची घोषणाबाजी सुरूच राहिली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांची धरपकड करून त्यांना ताब्यात घेतले.

कायद्याच्या चौकटीत मार्ग काढणार : फडणवीस

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर कायद्याच्या चौकटीत मार्ग काढण्यात येईल. ज्या मागण्या कायदेशीर संविधानाच्या चौकटीत बसणाऱ्या आहेत, त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात स्पष्ट केले. जे आंदोलन सुरू आहे, त्या बाबतीत चर्चा करण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी चर्चा करत आहेत. यापूर्वीही आपण मार्ग काढला आहे. यापुढेही काढणार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पहिल्या दिवसापासून अत्यंत संवेदनशीलपणे प्रयत्न करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. जरांगे यांचे जे आंदोलन सुरू आहे, त्यावर आमची चर्वेची दारे खुली आहेत. ज्या मागण्या कायदेशीर, संविधानाच्या चौकटीत बसणाऱ्या असतील आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या नसतील अशा सगळ्या मागण्यांवर आमची चर्चा करण्याची आणि मार्ग काढण्याची तयारी आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

जरांगे यांची तळमळ समजते; सरकार मराठा समाजाच्या पाठीशी : शिंदे

शेतकरी मेळाव्यात शिंदे यांनी भाषण सुरू केल्यानंतर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करण्यास प्रारंभ केला. तेव्हा शिंदे म्हणाले, ते आपलेच आहेत, त्यांना बोलू द्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणी दौरा करू नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले होते. परंतु शिंदे यांनी जरांगे यांच्या मराठा समाजाबद्दलच्या तळमळीच्या प्रयत्नांची प्रशंसा केली, मनोज जरांगे यांची तळमळ मला माहिती आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता समजासाठी लढतोय. मी मुख्यमंत्री असताना दोनवेळा जरांगेच्या भेटीसाठी गेलो होतो. इतर समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आम्ही घेतली, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी शिंदे यांनी मराठा आंदोलकांशी संवाद साधला आणि त्यांची मने जिंकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT