परभणी : शक्तिपीठ महामार्गाला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध कायम आहे. 
परभणी

Shaktipeeth Highway News : शक्तिपीठ महामार्गाला शेतकर्‍यांचा विरोध कायमच !

शेतकरी संकटात असताना जमीन मोजणीचा घाट; शेंद्रा येथील मोजणीसाठी आलेल्या पथकाला पिटाळले

पुढारी वृत्तसेवा

परभणी : शक्तिपीठ महामार्गाला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध कायम आहे. मंगळवारी तालुक्यातील शेंद्रा येथे शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी आलेल्या पथकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकर्‍यांनी आपल्या सोबत घेत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. शक्तिपीठ महामार्गाला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे. या महामार्गाच्या विरोधात शेकडो शेतकर्‍यांनी हरकती दाखल केल्या असून, या हरकतीवर निवाडा झाल्याशिवाय मोजणीसाठी जमिनीवर पाय ठेवू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकर्‍यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

नुकत्याच जिल्हाभरात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरीवर्ग हवालदिल झाला असताना जिल्हा प्रशासनाने मात्र शक्तिपीठाच्या जमीन संपादनासाठी मोजणीचा घाट रचला आहे. जिल्ह्यातील पूर्णा, परभणी, सोनपेठ या तीन तालुक्यांतून शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित आहे. मागील अनेक महिन्यांपासून शक्तिपीठ महामार्गाला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध होताना दिसून येत आहे. जुलै महिन्यामध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीसाठी आलेल्या महसूल विभागाच्या पथकाला ठिकठिकाणी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकर्‍यांनी पिटाळून लावत मोजणी उधळून लावली होती. त्यानंतर काही दिवस थांबत प्रशासनाने शक्तिपीठ महामार्गासाठी नव्याने जमीन मोजणीचा घाट रचला आहे. मंगळवारी महसूलचे पथक तालुक्यातील शेंद्रा गावात पोहचल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व संतप्त शेतकर्‍यांच्या रोषाला त्यांना सामोेरे जावे लागले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे व उपस्थित शेतकर्‍यांनी मोजणीसाठी आलेल्या पथकाला आपल्या सोबत घेत थेट उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठले. शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणून शेकडो शेतकर्‍यांनी हरकती दाखल केल्या आहेत. प्रशासनाने हरकती मागवल्यानंतर त्यावर सुनावणी घेणे अपेक्षित असते. असे असताना जिल्हा प्रशासनाने दाखल झालेल्या शेकडो हरकतींकडे साफ दुर्लक्ष करत पुन्हा एकदा नव्याने जमीन मोजणीचा घाट घातला आहे.

उपविभागीय अधिकारी उदय भोसले यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी दाखल झालेल्या हरकतींवर निवाडा करा अन्यथा मोजणीसाठी जमिनीवर पाय ठेवू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्यासह रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोडे, शिवा दामोधर, प्रसाद गरुड, विठ्ठल गरुड, दीपक गरुड, कैलास गरुड, तुकाराम शिंदे, संतोष गरुड यांच्यासह शेतकर्‍यांची मोठी उपस्थिती होती.

तूर्तास मोजणी स्थगित

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकर्‍यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर उपविभागीय अधिकारी उदय भोसले यांनी तर्तास शक्तिपीठ महामार्गासाठी होत असलेली मोजणी तूर्तास स्थगित करत असल्याचे उपस्थित शेतकरी शिष्टमंडळाला सांगितले. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला असताना प्रशासनाने हीच संधी साधत शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीचा घाट रचल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT