Severe onslaught of unseasonal rains accompanied by stormy winds.
परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अनेक भागांत सोमवारी (दि.३०) रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात मोठा बदल होत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वा-यासह झालेल्या या पावसामुळे शेतशिवारात उभ्या तसेच काढणीसाठी तयार असलेल्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः ज्वारी, हरभरा आदी पिकांना या पावसाचा जबरदस्त फटका बसला असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी काढणी करून शेतात ठेवलेली पिके पूर्णतः भिजली असून त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता खालावण्याची भीती व्यक्त होत आहे. ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात आडवे पडल्याने काढणी करणे कठीण झाले आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या हातात येणारा नफा कमी होणार आहे. दरम्यान, सध्या आंबा हे फळपीक भरात असताना या फटका दिला आहे.
वादळी वाऱ्यामुळे आंब्याची फुले व लहान फळे गळून पडली असून अनेक ठिकाणी झाडांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे फळबागधारक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. कृषी विभागानेही परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
रायखेडा शिवारात बैल दगावला
जिंतूर : तालुक्यातील रायखेडा शिवारात अवकाळी पावसासह झालेल्या विजेच्या कडकडाटामुळे एका शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि. ३१) पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. रायखेडा शिव-ारातील गट क्रमांक ९२ मधील शेतकरी नानासाहेब नामदेव दहिभाते यांच्या शेतात घटना घडली. सोमवारी (दि. ३०) सायंकाळपासून परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. रात्रभर विजांचा कडकडाट सुरू असताना पहाटेच्या सुमारास अचानक वीज कोसळून बैलाचा जागीच मृत्यू झाला.
यामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आधीच अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या दहिभाते कुटुंबावर आणखी संकट कोसळले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या वतीने तलाठी आर. आर. धुळे यांनी गावकऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकरी नानासाहेब दहिभाते यांनी शासनाकडे तत्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. तसेच अशा नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही करण्यात येत आहे.
पांगरा शिवारात आंबा फळबागेचे नुकसान
पूर्णा : तालुक्यातील पांगरा गाव शिवारात सोमवारी (दि.३०) रात्री ९ ते ९.३० वाजेच्या दरम्यान अचानक चक्रीवादळ टाईप वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाची गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीत बांधावरील गावरान झाडाला लगडलेल्या आंबा फळांची पडझड झाली. तसेच शेतकरी बाबाराव ढोणे यांच्या बागेतील केशर आंब्याचे १०० झाडे वादळीवाऱ्यात मोडून पडली. यात सदर शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान कृषी अधिकारी, तलाठी यांना संपर्क करुन माहिती दिली असता ते पंचनाम्यासाठी आले नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
याबरोबर तालुक्यातील बानेगाव, पेनूर, सातेफळ, धनगर टाकळी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडून शेतीपिकांचे नुकसान झाले. विजेचे खांब वाकल्या गेले. अचानक आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. या अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याने शेतातील बांधावर असलेल्या जुन्या झाडांना लगडलेल्या आंबा फळांची प्रचंड पडझड झाली. ठिकठिकाणी सकाळी झाडाखाली आंबा फळांचा सडा पडल्याचे दिसला असून शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
धारासुरात श्रीराम मंदिराच्या कळसावर वीज कोसळली
सोमवारी वादळी वारे व विजाच्या कडकडाटात जिल्हाभरात बहुतांश ठिकाणी पाऊस झाला. सोमवारी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास धारासुरातील मध्यवस्तीत असलेल्या श्रीराम मंदिराच्या कळसावर वीस कोसळल्यामुळे कळस तुटून जमिनीवर पडला. यावेळी २५ ते ३० भाविक पोथी पारायणासाठी मंदिरात उपस्थित होते. वीज कोसळल्यानंतर मंदिर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तद्नंतर ग्रामस्थांनी श्रीराम मंदिराकडे धाव घेतली.