सेनगाव : प्रस्‍तावित सुकळी साठवण तलावाची पाहणी करण्यासाठी आलेल्‍या उपविभागीय अधिकाऱ्यांचे एका महिलेने पाय धरून तलाव रद्द करण्याची मागणी केली.  pudhari photo
परभणी

Sengaon farmers protest : आधी आमच्‍यावर गोळ्या झाडा, मगच जमिनी घ्या !

पाहणीदरम्‍यान शेतकरी आक्रमक, 'त्या' मुलाच्या इशाऱ्याने प्रशासन हादरले

पुढारी वृत्तसेवा

सेनगाव : ‘आधी आमच्‍यावर गोळ्या झाडा, त्‍यानंतरच आमच्‍या जमिनी घ्या’ असा इशारा तालुक्यातील सुकळी येथे शुक्रवारी प्रस्तावित साठवण तलावाच्या जागेची पाहणी करण्यासाठी आलेले उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे आणि जलसंपदा विभागाच्या पथकासमोर संतप्‍त झालेल्‍या शेतकऱ्यांनी दिला.

प्रस्‍तावित सुकळी साठवण तलावाच्‍या पाहणीसाठी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी घुटूकडे व जलसंपदा विभागाचे अधिकारी दाखल झाले होते. यादरम्‍यान बाधित शेतकरी आणि महिलांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आमच्यावर गोळ्या घाला, पण आम्ही आमच्या हक्काच्या जमिनी देणार नाही, अशी आक्रमक घोषणा देत शेतकऱ्यांनी तलाव पूर्णपणे रद्द करण्याची मागणी लावून धरली.

तलावस्थळी संतापाचा बांध फुटल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांची गाडी अडवून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.या गोंधळात एका वयोवृद्ध महिलेने चक्क उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांचे पाय धरत तलाव रद्द करण्याची आर्त विनवणी केली. हे हृदयद्रावक दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. गावकऱ्यांचा हा तीव्र जनक्षोभ आणि आक्रमक पवित्रा पाहता, पुढील बैठक घेतल्याशिवाय कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी जमीन मोजणीसाठी गावात येणार नाही, असे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांना शेवटी द्यावे लागले.

प्रस्तावित सुकळी साठवण तलावामुळे परिसरातील सुकळी खुर्द, सुकळी बुद्रुक,दाताडा खुर्द आणि दाताडा बुद्रुक या चार गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.भूसंपादन कायद्यांतर्गत या चारही गावांतील शेतजमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया प्रस्तावित असल्याने,शेकडो कुटुंबे भूमिहीन होण्याच्या उंबरठ्यावर उभी आहेत.

आंदोलनात सहभागी झालेल्या एका पीडित महिलेने भावनिक होत अधिकाऱ्यांना जाब विचारला,माझ्या पतीचा मृत्‍यू होऊन १२ वर्ष झाले. मुलगा छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण घेऊन गेल्या ५ वर्षांपासून बेरोजगार आहे. जर आमची एकमेव हक्काची शेतीच तलावात जाणार असेल, तर आम्ही जगायचे कसे सांगा साहेब? असा सवाल केला. या प्रकल्पामुळे जर आमची सुपीक जमीन गेली,तर भविष्यात आमच्या मुलांना कोणी लग्न करायला मुलगी देखील देणार नाही,असा अत्यंत व्यावहारिक प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT