सेलू : तालुक्यात महा-ई-सेवा केंद्र पोर्टल बंद असल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदरील पोर्टल गेल्या दोन दिवसापासून बंद असल्याने विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक प्रमाणपत्र काढण्यास अडचणी येत असून पोर्टलं बंद असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत.
महा ई सेवा पोर्टल बंद असल्यामुळे जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिलियर व अकरावी प्रवेशासाठी लागणारे प्रमाणपत्र मिळत नाहीत. त्याचबरोबर जेई ऍडव्हान्स सारख्या परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 02 मे आहे. परंतु पोर्टलच बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना जेई ऍडव्हान्स परीक्षेसाठी उत्पन्न प्रमाणपत्र व सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मिळणे दुरापास्त झाले आहे.
त्यामुळे त्यांना परीक्षा फॉर्म भरणे मुश्किल होणार आहे. तालुक्यातील नागरिक मानसिक तणावात असून सदरील पोर्टल कधी सुरू होईल आणि आपल्या पाल्यास प्रमाणपत्र कधी मिळतील यासाठी परेशान आहेत.