पूर्णा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताचेच नव्हे, तर जगाच्या पाठीवरील अद्वितीय महापुरुष आहेत. त्यांच्या विचारांचे कोट्यवधी लोक पूजन करतात, मात्र ते विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी केले.
पूर्णा येथे आयोजित अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेत ते बोलत होते. यावेळी बौध्द धम्म परिषदेचे मुख्य मार्गदर्शक पूज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या धम्मकार्याचा गौरव करण्यात आला. दक्षिण कोरिया येथील पूज्य भंते युम जेयुंग हो, बुध्दिस्ट युनिव्हर्सिटीचे माजी व्हॉइस चान्सलर डॉ.ली.ची.रॅन, महिला उद्योगपती एन.नागिम व किंम डोंग गीव यांच्यासह भारतीय व दक्षिण कोरियन भिक्खू संघाची उपस्थिती होती.
मंत्री शिरसाठ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली. ते म्हणाले, दरवर्षी 6 डिसेंबर रोजी मुंबई येथील चैत्यभूमीवर अभिवादनासाठी लाखो अनुयायी लांबच लांब रांगा लावतात. त्या ठिकाणी बाबासाहेबांवर लिहिलेली पुस्तके मोठ्या प्रमाणात विकली जातात. हा जनसमुदाय केवळ भावनिक नाही, तर वैचारिकदृष्ट्याही जागरूक आहे, हे त्यातून स्पष्ट होते. डॉ.आंबेडकर ही आमची अस्मिता आहे. ज्या ठिकाणी त्यांचा अवमान होतो, त्या ठिकाणी आंबेडकरी समाज पद, प्रतिष्ठा किंवा नोकरीची तमा बाळगत नाही, असे मत व्यक्त केले.
प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांत बाबासाहेबांचे नाव का घेतले जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे डॉ.आंबेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या ऐतिहासिक बुध्द धम्मदीक्षा सोहळ्यात आपल्या आजोबांनी सहभाग घेतल्याची आठवण त्यांनी सांगितली. आम्ही तथागत भगवान बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रध्दा ठेवून चालणारी माणसे आहोत, असे म्हटले. डॉ.आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक कार्याचा वारसा जिवंत ठेवण्यासाठी शासनाने 500 कोटींची मदत दिल्याचेही सांगितले.
तरुणांनी केवळ साध्या नोकऱ्यांच्या मागे न लागता उच्च पदस्थ अधिकारी, उद्योजक व उद्योग क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन केले. सूत्रसंचलन भदंत पयानंद व भदंत धम्मशील यांनी केले. परिषद यशस्वीतेसाठी बुध्द विहार समिती, महिला मंडळ, समता सैनिक दल, स्काऊट-गाईड तसेच अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.