सेलू : सायबर गुन्हेगारीचे वाढते जाळे किती भयानक स्वरूप धारण करत आहे, याचे धक्कादायक उदाहरण सेलू येथे समोर आले आहे. अज्ञात सायबर टोळीने निवृत्त शिक्षकाला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत तब्बल 97 लाख 83 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
नागनाथ शंकरराव कुरमुडले (वय 70, रा. मौलाना आझाद नगर, सेलू) यांना 4 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत विविध मोबाईल क्रमांकांवरून सातत्याने फोन व व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करण्यात आले. आरोपींनी स्वतःला पोलीस, तपास अधिकारी किंवा सरकारी यंत्रणेतील अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्यावर गंभीर आर्थिक गुन्हा नोंद झाल्याचे खोटे सांगितले. त्यांच्या नावाने मुंबईत बँक खाते उघडून गैरव्यवहार झाल्याचा बनाव करून त्यांना मानसिकदृष्ट्या पूर्णपणे घाबरवण्यात आले.
तसेच, तात्काळ अटक होण्याची भीती दाखवत तपासात सहकार्य करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. ही बाब कुणालाही सांगितल्यास पेन्शन बंद करण्याची व मुलाची नोकरी घालवण्याची धमकी देत कौटुंबिक दबावही टाकण्यात आला.
या भीतीच्या वातावरणात अडकलेल्या कुरमुडले दाम्पत्याला पोस्टातील फिक्स्ड डिपॉझिट मोडण्यास, पेन्शनवर कर्ज घेण्यास तसेच घरातील सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर विविध बँक खात्यांमध्ये आरटीजीएस व चेकद्वारे टप्प्याटप्प्याने एकूण 97 लाख 83 हजार रुपये वर्ग करण्यात आले.
या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 316(2), 318(4), 351(2)(3), 61(2) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(C) व 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पुंगळे तपास करत असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषण व मोबाईल क्रमांकांचा मागोवा घेतला जात आहे.
सायबर पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ‘डिजिटल अरेस्ट’, ईडी, सीबीआय किंवा पोलीस अधिकारी असल्याचे सांगून येणारे कॉल व व्हिडिओ कॉल पूर्णपणे फसवे असतात. अशा प्रकारच्या कॉल्सना बळी पडू नये, कोणतीही आर्थिक माहिती शेअर करू नये आणि तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. सेलूतील ही घटना परिसरातील आतापर्यंतच्या मोठ्या सायबर फसवणूक प्रकरणांपैकी एक मानली जात असून, नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.