चारठाणा, पुढारी वृत्तसेवा: चारठाणा येथील आरोग्य केंद्राच्या परिसरात दुर्मिळ असा निळ्या डोळ्यांचा मुंगशा पक्षी आढळल्याची माहिती पक्षी निरीक्षक विजय ढाकणे यांनी दिली. आरोग्य केंद्र परिसरातील झाडांची छाटणी करत असताना नवीन प्रजातीचा पक्षी झुडपात बसल्याचे लक्षात आल्यावर निरीक्षण केले असता आपल्या भागात दुर्मिळ असलेला निळ्या डोळ्यांचा मुंगशा पक्षी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मागील कित्येक वर्षांपासून या परिसरासह जिल्हाभरात पक्षी निरीक्षणासाठी फिरत आहे. मात्र, या परिसरात हा पक्षी पहिल्यांदा दिसला असल्याचे त्यांनी सांगितले. या पक्ष्याला निळ्या डोळ्याचा मुंगशा किंवा निळ्या चेहऱ्याचा मालकोहा (Blue Faced Malkoha) असेही म्हणतात. हा पक्षी भारत आणि श्रीलंकेच्या द्विपकल्पिय झाडी आणि पानझडीच्या जंगलात आढळतो. याच्या डोक्याचा आणि पाठीकडचा भाग हा गडद राखाडी रंगाचा असून त्यावर तेलकट हिरव्या चमकदार रंगाची पिसे असतात. शेपटी लांब आणि टोकदार असून त्यावर खालच्या भागात पांढरे ठिपके असतात. डोळ्याभोवती निळसर रंगाची कडा असल्याने याला निळ्या डोळ्यांचा मुंगशा असे म्हणतात. तर याची चोंच हिरव्या सफरचंदासारखी असते. परजीवी नसलेला हा कोकीळ प्रजातीतील पक्षी आहे.
निळ्या डोळ्यांच्या मुंगशा सारखे दुर्मिळ पक्षी आपल्या भागात दिसून येत आहेत. हे पक्ष्यांच्या समृद्ध जैवविविधतेचे लक्षण आहे. त्यांच्या संवर्धनासाठी परिसरातील अवैध वृक्षतोड थांबवणे, माळराने व त्यावरील खुरट्या झुडपांचे रक्षण करणे गरजेचे आहे, असे मत ढाकणे यांनी व्यक्त केले.