पूर्णा : तालुक्यातील फुकटगाव शिवारात शुक्रवारी (दि. ३० जानेवारी) सकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान पनवेल एक्स्प्रेस रेल्वे डब्यातून पडून एका ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर तिच्या सोबत असलेला एक युवक देखील पडून गंभीर जखमी झाला असल्याची घटना घडली आहे. भाग्यश्री अमोल देवतळे (वय - ३२ वर्ष, रा. असोली, ता. माहूर, जि. नांदेड) असं मयत महिलेचं नाव आहे. तर मिथून रमेश गवळी रा असोली असे जखमी युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील माहूर तालूका असोली येथील मयत महिला भाग्यश्री देवतळे, पति अमोल वसंत देवतळे, मिथून गवळी हे तिघे (दि. ३० जानेवारी) पनवेल एक्स्प्रेस रेल्वेमधून नांदेडकडे येत होते. सदरील रेल्वे एक्स्प्रेस फुकटगाव शिवारात येताच मयत महिला लघूशंका करण्यासाठी बाथरुमकडे गेली असता तिचा तोल जावून दरवाज्यातून ती रेल्वेखाली पडली. दरम्यान रेल्वेखाली येवून तिचा जागीच मृत्यू झाला.
सदर महिलेसह सोबतचा मिथुन गवळी हा धावत्या रेल्वेतून पडून जखमी झाल्याची माहिती मयत महिलेचा पती अमोल यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना दिली. दरम्यान, सदरील घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे एपीआय गजानन पाटील,सपोउनि रमेश मुलेमुले,पोशि स्वाती धबडे, दक्षता कमटी सदस्य संघमित्राताई जोंधळे यांनी भेट देत पंचनामा केला. शासकीय ग्रामीण रुग्णालयात दुपारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर महिलेस एक १४ वर्षाची मुलगी तर १० वर्षाचा मुलगा आहे.