पूर्णा : तालूक्यातील चुडावा, एरंडेश्वर, कावलगाव, वझूर, ताडकळस, गौर या सहा जिल्हा परिषद गटासाठी तर बारा पंचायत समिती गण सदस्य निवडीसाठी निवडणूक ५ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. त्याकरीता ता २१ जानेवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्ष तथा अपक्ष उमेदवारांची एकच धांदल उडाली. सहा जिल्हा परिषद गटासाठी ता १६ ते २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण ८७ तर बारा पंचायत समिती गणाकरीता १५३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
दरम्यान, येथील न्यायालय परिसरात वकिल मंडळींकडून उमेदवारी अर्ज भरुन फार्मलीटी प्रक्रिया करुन घेण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि सुचक,कार्यकर्ते गर्दी करीत होते. सदर उमेदवारी नामानिर्देशन पत्र प्रकिया आफलाईन असल्यामुळे तो बारकाईने अचूक भराव लागत होता. त्यामुळे अर्ज भरुन पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागत असल्यामुळे निवडणूक कक्षात देखील तीन ठिकाणी अर्ज चेक अधिकाऱ्यांच्या सह्या घेवून मग निर्वाचन अधिकाऱ्याकडे दाखल करण्यात आले.
या प्रक्रियेत खुप वेळ खर्ची पडत होता. त्यातच वेळ दुपारी ३ पर्यंतच. यामुळे अनेकांना वेळ संपला की परत जावं लागत होतं. त्यामुळेच शेवटच्या दिवशी एकच गर्दी उसळून शक्ती प्रदर्शनात आलेल्या उमेदवारास कार्यकर्त्यांना ताटकळत बसावे लागले. उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्यासाठी निवडणूक निर्वाचन अधिकारी प्रतिभा गोरे, बोथीकर, पंढरीनाथ शिंदे, व्यंकटेश ज्वजरवार, के पी शिंदे, शेलगावकर, कटके आदी महसूल कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवारासह कार्यकर्त्यांचे जथ्थेच्या जथ्थे तहसिल कार्यालय परिसरात दाखल झाले होते. यानंतर, येत्या दोन दिवसांत युती होणार की नाही? हे स्पष्ट होणार आहे. सदरील निवडणूकीसाठी जि प उमेदवारांसाठी ६ लाख तर पंचायत समितीसाठी ४ लक्ष ५० हजार रुपये खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. असा निवडणूक आयोगाचे निर्देश असताना खर्च मर्यादा ओलांडली जातेय का? याकडे अधिकाऱ्यांनी पाहणं गरजेचं आहे.