पूर्णा: तालूका परिसरात मागील एक ते सव्वा महिन्यांपासून पाऊसाचा प्रदिर्घ खंड पडला आहे. परिणामी, खरीपातील सोयाबीन मुग उडिद तूर ही पिके करपून जाताहेत. त्याच बरोबर कापूस, हळद,ऊस या दिर्घ कालावधीतील पिकांची वाढ खुंटली आहे.
त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. गत वर्षी अतिवृष्टीमुळे अन् औंदा पाऊसाचा खंड या दुहेरी नैसर्गिक आपत्तीत खरीप हंगाम हातचा जात आहे. ओल्या आणि सुक्या दुष्काळात शेतकरी नेहमीच भरडला जात आहे. यातच, पिकाची जोखीम म्हणून असंख्य शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिकांचा हप्ता उतरवत आहेत. या योजनेत विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या शिवारातील पिके कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ ह्या आपत्तीत नष्ट होताहेत. तरी देखील पिकविमा कंपनी शेतकऱ्यांना नवीन हंगाम सुरू झाला तरी नुकसान भरपाई देत नाही.
त्यामुळे पिक विमा योजनेतून कंपन्या शेतकऱ्यांची लूटच करत असल्याचे स्पष्ट होत आहे.गत वर्षी अतिवृष्टी आणि यंदा प्रदिर्घ पाऊसाचा खंड, यात खरीप हातचा गेला. सध्या सोयाबीन मुग उडिद पिकाला फुल शेंगा लगडल्याकी पाऊसाने उघडीप दिली. त्यामुळे जमिनी कोरड्या ठाक पडून ऐन पावसाळ्यात उन्हाळ्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतक-यांनी जगावं की मरावं, हेच समजत नाही. आधीच महागाई गगनाला भिडली असून बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषधी, मजुरीची दरं कमालीची वाढलीत. यातून उत्पादन खर्चावर आधारित उत्पन्न काढले तर शेतकरी नफ्या ऐवजी कर्जबाजारीच होत आहे. सध्या पाऊसाच्या खंडाने सुकून वाळून जाण्या-या खरीप पिकांची पाहणी करुन कृषी व महसूल प्रशासनाने पंचनामे करावीत, तसेच खरीप हंगाम २०२५ ची पिक विमा नुकसान भरपाई त्वरित अदा करावी.अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.