पूर्णा : पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या पूर्णा ते पांगरा (मार्गे हिवरा) रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने आणि कंत्राटदाराने काम अर्धवट सोडल्याने संतप्त ग्रामस्थांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 14) रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.
आशीर्वाद कन्स्ट्रक्शनने या रस्त्याचे काम घेतले होते. मात्र, कंत्राटदाराने केवळ खडी टाकून काम अर्धवट सोडले. यामुळे रस्त्यावर खडी पसरून अपघात वाढले आहेत. या विरोधात जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता पाळत कॉ. नशीर शेख, सुबोध खंदारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे अभियंता वाघ आणि कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गासाठी होणाऱ्या वाहतुकीमुळे कामात अडचण येत आहे. मात्र, कामात विलंब केल्यामुळे संबंधित कंत्राटदाराला सव्वा कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्याने हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. मात्र, 10 दिवसांत काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात बाबाराव ढोणे, आनंद ढोणे, सरपंच उत्तमराव ढोणे आदी सहभागी झाले होते.