पूर्णा : तालूक्यातील पांगरा ते पूर्णा या ६ किमी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.सदरील रस्त्यावर या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्णा ते हिवरा गावापर्यंत सुमारे १२ किमी अंतर रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरणाचे काम घेतलेल्या गुत्तेदाराने सुरुवातीला माती मिश्रित मुरुम वापरुन दोन लेअर मजबुतीकरण केले.
रस्त्यावर चुनखडीयुक्त माती मिश्रित निकृष्ट दर्जाचा मुरुम टाकल्याने पाऊस पडताच हा संपूर्ण रस्ता चिखलमय होत आहे. सध्या पावसाळा चालू असल्यामुळे एखादा पाऊस पडला की चिखलामुळे दुचाकी चारचाकी वाहनांची वाहतूक ठप्प होत आहे. शिवाय, चिखलात अडकून दुचाकी पडून अपघात होताहेत. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्याच बरोबर ज्या वेळी ह्या रस्ता मजबुतीकरणाचे काम सबंधीत गुत्तेदाराने हाती घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून अचानक जालना ते नांदेड या समृद्धी महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गतच्या गुत्तेदाराचे हायवा जडजवाहीर टिप्परची गौणखनिज मालाची वाहतूक सुरू झाली.
त्यामुळे समृद्धी महामार्गाची वाहने रात्रंदिवस चालू झाल्याने हा रस्ता करणे प्रधानमंत्री योजनेअंतर्गतचा रस्ता काम मे आशिर्वाद कंट्रक्शन लातूर गुत्तेदार देशमुख यांनी बंद केला. त्यानंतर पांगरा येथील सामाजिक कार्यकर्ते बाबाराव ढोणे यांनी सदर रस्ता कामासाठी अमरण उपोषण केले होते. तद्नंतर एम एस आर डी सी चे कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक कार्यकारी अभियंता वाघ व तहसीलदार प्रशांत थारकर आणि उपोषणकर्ते यांच्यात तहसिल स्तरावर ता ४ फेब्रुवारी २०२६ रोजी बैठक झाली. तीत असे ठरले की, पूर्णा ते पांगरा गावापर्यंतच्या रस्त्यावर समृद्धीची वाहने चालू आहेत. तिथ पर्यंतचा रस्ता सोडून उर्वरित पांगरा ते हिवरा गावापर्यंत प्रधानमंत्री सडक योजनेच्या गुत्तेदाराने काम पूर्ण करावे.
शिवाय,पूर्णा ते पांगरा पर्यंत समृद्धी महामार्गाच्या गुत्तेदाराने खराब झालेल्या रस्त्यावर कठीण मुरूम टाकून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत ठेवावा. यानंतर प्रधानमंत्री सडकच्या गुत्तेदाराने पांगरा ते हिवरा गावापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण केलेच नाही. त्याच बरोबर समृद्धीच्या गुत्तेदाराने शुध्दा त्यांनी वाहतूक केलेल्या रस्त्यावर कठीण मुरूम टाकला नाही. दोन्ही गुत्तेदारांनी धोका दिला.परिणामी , हा रस्त्त्याची अवस्था अंत्यत दयनीय झाली. आता ज्या ज्या वेळी पाऊस पडला की रस्ता चिखलामुळे बंद पडत आहे. दरम्यान, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंता यांनी समृद्धी महामार्गाच्या कार्यकारी अभियंता यांना पत्रव्यवहार करुनही त्यास केराची टोपली दाखवली. या दोघांच्या वांद्यात सदरील रस्त्यावरुन वाहतूक करणं म्हणजे तारेवरची कसरत बनली असून खासदार संजय जाधव यांच्याही सुचनेला जुमानले जात आहे.