Purna sugar factory worker death
पूर्णा : पूर्णा-नांदेड मुख्य रस्त्यावरील न-हापूर स्टॉप येथे मंगळवारी (दि. ९) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव लोडिंग ऑटोच्या धडकेत भाटेगाव येथील २८ वर्षीय मुंजाजी सुदाम क-हाळे हा दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. अपघातानंतर चालक वाहन सोडून पसार झाला.
मृत मुंजाजी क-हाळे हा पूर्णा सहकारी साखर कारखाना, वसमत येथे काम करत होता. तो आपल्या दुचाकीवरून (एमएच २२ बीबी १९१५) भाटेगावकडे परतत असताना नांदेडहून भरधाव वेगाने येणाऱ्या ऑटो (एमएच २६ बीई ५७३८) लोडिंग वाहनाने जोरदार धडक दिली. यात मुंजाजी रस्त्यावर फेकला गेला. डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच मृत्यूमुखी पडला.
या अपघातानंतर चालकाने गाडी घटनास्थळी टाकून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. माहिती मिळताच चुडावा पोलीस ठाण्याचे सपोनि सुशांत किनगे, पोउनि अरुण मुखेडकर व सपोउनि हिरक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृताचा चुलते चंद्रकांत रामदास क-हाळे यांच्या फिर्यादीवरून ऑटो चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या मुंजाजी क-हाळे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व एक लहान मूल असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने भाटेगाव गावात शोककळा पसरली आहे.