पूर्णा : नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकात दोन प्रभागांतील सदस्यपदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. मात्र नगराध्यक्षपदासह उर्वरित २१ सदस्यांच्या निवडणुका पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच २ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहेत.
प्रभाग क्र. १, जागा क्र. (ब) (आरक्षण – सर्वसाधारण) आणि प्रभाग क्र. १०, जागा क्र. (व) (आरक्षण – ना.मा.प्र.) या दोन्ही जागांबाबत दाखल झालेल्या अपीलांवरील जिल्हा न्यायालयाचा निर्णय २२ नोव्हेंबरनंतर दिला जाणार आहे. त्यामुळे या दोन जागांची निवडणूक प्रक्रिया मूळ कार्यक्रमानुसार राबविणे शक्य राहिले नाही.
राज्य निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निर्देशानुसार या दोन प्रभागांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांनी कळविले. दरम्यान, नगरपरिषदेच्या इतर २१ सदस्यपदांसाठी आणि नगराध्यक्षपदासाठीचा कार्यक्रम अपरिवर्तित राहणार आहे. त्यानुसार मतदान २ डिसेंबर रोजी तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होईल.
दर दोन जागांसाठीचा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या सूचित परिशिष्ट-०१ नुसार लवकरच घोषित होईल, अशी माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे संबंधित प्रभागांतील उमेदवार व मतदारांमध्ये चर्चांना उधाण आले असून, उर्वरित प्रभागांमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला आहे.