पूर्णा : तालूक्यातील सर्वच शेतशिवारात अलिकडच्या काही वर्षांपासून रानटी डुकरांचा मुक्त संचार वाढला आहे. सदरील डुकरांचा कळप रात्री उभ्या पिकात घुसून सुरुंग लावत नासधूस करताहेत. यातच,इतर पिकांपेक्षा भुईमूग पिकाचा तर डुकरं कर्दनकाळच आहेत.हे डुकरं पेरणी केलेल्या भुईमूग पिकाची नासधुस करतात.
यावर उपाय म्हणून पिक उध्वस्त करु नये, यासाठी सध्या ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी भुईमूग पिक क्षेत्राभोवती पॉलिस्टर साड्या आणि ग्रीन नेट कपड्यांचे कुंपण उभारले आहे. या साड्या आणि ग्रीन नेट कपड्यांच्या कुंपणाला पाहून डुकरं घाबरतात असे काही शेतकऱ्यांचे मत आहे. मागील काही वर्षांपासून शेत शिवारात रानटी डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसेंदिवस त्यांच्या संख्येत लक्षणीय ?वाढ झाली आहे.
सर्वच ठिकाणी डुकरांची कळपेच कळपं दिसून येत आहेत. ही डुकरं अधिक करुन रात्री उशिरावेळी पिकात शिरुन नासधूस करतात. त्यामुळे शेतकरी त्यांच्या उपद्रवास अतिशय कंटाळून गेले आहेत. त्याच बरोबर वानरांचा देखील त्रास सुरु झाला आहे. या रानटी प्राण्यामुळे कोणतेही पिक हातात पडे पर्यंत शेतकऱ्यांना शाश्वती राहिलेली नाही.यातच,बदलते हवामान आणि अवकाळी येणाऱ्या वादळीवाऱ्यासह पाऊस, गारपीट या नैसर्गिक संकटामुळे सुध्दा शेतकरी त्रस्त आहे. .काही वेळा मातलेली रानटी डुकरं शेतकऱ्यावर प्राणघातक हल्लाही चढवताहेत.