आनंद ढोणे
पूर्णा: तालूका परिसरात औंदा मोठ्या प्रमाणावर कोरडा दुष्काळ पडलाय.परिणामी,औंदा बांधावरील गावरान सिताफळ उत्पादन कमालीचे घटले असून सिताफळाची गोडी दुर्मिळ होणार आहे. कारण कोरड्या दुष्काळामुळे बांधावरील जुनी गावरान सिताफळाची झाडं सुकून जाताहेत. जमिनीत ओलावाच नसल्याने लगडलेली सिताफळे पाण्याअभावी परिपक्व न होता कोमेजून जाताहेत.
दरवर्षी अक्टोबर महिन्यात रानोवनी व बांधावरील काटेरी झुडुपातील सिताफळ झाडांना सिताफळे लगडून लदबदलेली पहावयास मिळतात. झाडांनाच सिताफळे पिकून जातात. हंगामात पिकलेली पाडांची सिताफळे खाण्यात वेगळा आनंद असतो. बरेच शेतकरी ते बाजारात विक्रीसाठी देखील नेतात.
बांधावरील गावरान सिताफळं ही संकरीत वाणापेक्षा अधिक गोड असतात. त्यामुळे हिवाळी हंगामात सिताफळांचा ओल्या दुष्काळात सर्वत्र सुकाळ पहावयास मिळतो. मात्र, यंदा कोरड्या दुष्काळाने सिताफळांची झाडं सुकून कोमेजून गेली आहेत.
झाडास सिताफळं मोठ्या प्रमाणावर लगडली परंतू पाऊसच नसल्यामुळे फळं झाडावर सुरकुत्या होवून जाताहेत. दरम्यान, यंदा सिताफळाची गोडी चाखणं मुश्कील झाली आहे.पाऊसकाळाचे साल असल्यावर सिताफळांचा हंगाम फार्मात येतो. यंदाच्या वर्षी पाऊसच नसल्यामुळे सिताफळ हंगाम पूर्णपणे वाया जाताना दिसून येत आहे.