पूर्णा: येथील नवा मोंढा परिसरात एका नागरीकाच्या घरी बुधवारी (दि. ८) दुपारी दिवसा ढवळ्या अज्ञात चोरांनी धाडसी घरफोडी केली. यात, सुमारे दिड लाख रुपये रोख रक्कम व काही सोन्या चांदीचे दागिने चोरुन चोर पळवल्याची घटना घडली आहे. दरम्यान पूर्णा पोलिस ठाण्यात सदर घटनेची तक्रार माहिती देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा शहरातील नवा मोंढा परिसरात असलेले प्रसिद्ध व्यापारी अनिल अग्रवाल यांच्या बंद घराचे ८ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून सुमारे दिड लाख रोख रक्कम व सोन्या–चांदीचे दागिने असा मोठ्या किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. सदर चोरीची घटना दिवसा ढवळ्या घडल्यामुळे शहरवासीयातून आश्चर्य व्यक्त केले जात असून पोलिस सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान शहरातील नवा मोंढा भागात व्यापारी अनिल मुन्नालाल अग्रवाल यांचे दुमजली राहते घर आहे. अग्रवाल हे आपल्या बंधूसह येथे वास्तव्यास आहेत. ते काही दिवसापूर्वी त्यांच्या कर्नाटक राज्यातील मुलीकडे श्रिमद भागवत कथा यज्ञ सुरू असल्यामुळे कुंटूबियासह (दि. ६) कर्नाटक येथे गेले होते. या दरम्यान, त्यांचा मुलगा संकेत अग्रवाल हा घरी एकटाच होता. तो ताडकळस रोडवरील “अग्रवाल ऑटोमोबाईल्स” या दुकानाचा मालक आहे व तो बुधवारी सकाळी घराला कुलूप लावून दुकानावर गेला होता. सायंकाळी ७ वाजेदरम्यान तो दुकान बंद करून घरी आला असता त्याने घर पाहिले तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता.
घरात प्रवेश करताच, घरातील अस्ताव्यस्त पडलेले सामान त्याच्या नजरेस आले. कपाटांचे दरवाजे उघडे दिसले. तात्काळ त्याने इतर ठिकाणी पाहणी केली असता, त्यास व्यापारातील १ लाख ५५ हजार रुपयांची रोकड आणि कपाटात ठेवलेले जुने वापरातील सोन्या–चांदीचे दागिने गायब झाले असल्याचे समजले. त्याने त्वरित आरडाओरडा करत वरच्या मजल्यावरील आपल्या काकांना व आजोबांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे पोनि विलास गोबाडे, सपोनि सोमेश्वर शिंदे, जमादार श्याम कुरील, बंडू राठोड,टाकरस, शेंबेवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करुन शेजाऱ्यांकडून घटनेबाबत माहिती घेतली. घरातील कपाटाचे कुलूप जबरदस्तीने तोडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या घरफोडीप्रकरणी ठसे तज्ञांना तसेच श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासही सुरुवात केली आहे.
अनिल अग्रवाल हे सध्या कर्नाटकात असून, ते परत आल्यानंतर घरातील दागिन्यांची नेमकी मात्रा आणि अंदाजे किंमत स्पष्ट होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे दिड लाख रुपयांची रोकड आणि हजारो रुपयांचे सोन्या–चांदीचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे समजते.
ही घटना दिवसाढवळ्या, गजबजलेल्या नव्या मोंढा भागात घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “शहरात पोलिस गस्त असूनही चोरट्यांनी एवढ्या निर्भयपणे घरफोडी केली, तर शहर सुरक्षित आहे का?” असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. शहरात या घटनेची चांगलीच चर्चा रंगली असून, चोरट्यांना लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, पुर्णा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून कसून तपास चालू आहे.