पूर्णा : तालूक्यातील पांगरा ढोणे येथील प्रगतशील शेतकरी तथा वसमत पंचायत समितीचे माजी सभापती, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मा संचालक प्रकाशराव शेषरावजी ढोणे पाटील (वय ७०) यांचा ता ३ मे रोजी दुपारी नांदेड येथील अर्धापूर रोडवर असनापुल परिसरात दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
ते स्वतः च्या दुचाकीवरून पाहुण्याकडील लग्न सोहळ्यासाठी जात असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. असनापूल नांदेड विमानतळ परिसरात मुख्य रस्त्यावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या घटनेत त्यांच्या शरिराला गंभीर मार लागून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला असल्याची माहिती कळाली आहे. दरम्यान, नांदेड असनापूल दूरक्षेत्र भागातील पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती देखील सांगण्यात आली.
अपघातानंतर त्यांना नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.परंतू, तिथं डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषित केले असल्याचे उपस्थितांनी माहिती दिली. त्यांचे पार्थिव नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करुन शवविच्छेदन केल्यानंतर पांगरा ढोणे येथे त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ६ नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी कळवले आहे.
प्रकाशराव ढोणे पाटील यांनी पांगरा गावच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती.ते स्व: विलासराव देशमुख यांच्या काळात अनेक वर्षे काँग्रेस आय पक्षात कार्यरत होते. त्यावेळी ते पंचायत समिती निवडणुकीत निवडून येत वसमत पंचायत समितीचे पाच वर्षे सभापती होते. तत्कालीन कारकीर्दीत त्यांनी सर्वांगीण विकासाच्या बाबतीत वसमत पंचायत समिती राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आणली होती.
त्याच बरोबर दि परभणी जिल्हा म स बँकेचे ५ वर्ष संचालकही होते.अतिशय अभ्यासू नेतृत्व आणि मनमिळावू स्वभाव असी त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, तिन बहिणी, असा परिवार असून ते सरपंच उत्तमराव ढोणे यांचे मोठे बंधू, प्रा. प्रशांत ढोणे यांचे वडील तर आमदार राजू भैया नवघरे यांचे मामा होत. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात एकच शोककळा पसरली आहे.