पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : कंठेश्वर येथील शेतकऱ्याची बैलासह बैलगाडी चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चुडावा पोलिसांनी बैलगाडी चोरट्याला ताब्यात घेतले आहे. प्रकाश चव्हाण (वय.25, रा. चोरंबा. ता.अर्धापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मारोती विठ्ठलराव कदम यांच्या शेत आखाड्यावरुन बैलासह बैलगाडी चोरट्याने पळवली होती. यानंतर चोरट्यास चुडावा पोलिसांनी जेरबंद केले आहे. सोमवारी (दि.28) रात्री बैलगाडी लावून त्यात असलेले चार क्विंटल सोयाबीन पोते, गोदडे, भांडी असा एकूण 1 लाख 27 हजाराचा ऐवज लंपास केला होता. अशी तक्रार शेतकऱ्याने पोलिसांत केली होती. यानंतर पोलिसांनी पथक तयार करुन तपास करायला सुरुवात केली. तपासादरम्यान शुक्रवारी (दि.1) सकाळी 6 वाजता संशयित चोर बळीराजा साखर कारखाना जवळील कानखेड-अजदापूर शिवारातील गवताच्या शेतात गाडी बैल सोडून तब्बल तीन दिवस मुक्कामास असल्याचे तेथून जाणा-या दुधवाल्या शेतकऱ्यास निर्दशनास आला.
यानंतर फिर्यादी मारोती कदम यांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी कंठेश्वर येथील नागरिक शेतकरी व चुडावा पोलीस दाखल झाले. यानंतर संशयित आरोपी पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन पोलिसांनी त्याला पकडले. शनिवारी (दि.2) त्याला पूर्णा येथील न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्यास एम सी आर करुन जिल्हा कारागृहात रवानगी केली. यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यास बैलजोडी ताब्यात दिली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बैलगाडी, सोयाबीन पोती व ईतर साहित्य शेतकऱ्याच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.