Parbhani Politics 
परभणी

Parbhani Politics : जिल्हा परिषदेत भाजपाचे तीन सभापतीपदे राहणार? गुरुवारी फैसला

उबाठाची भाजपकडे झुकती बाजू ; शिंदे गटाचीही धडपड, राष्ट्रवादीला वगळले जाण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

परभणी : जिल्हा परिषदेत सभापती पदांच्या निवडीपूर्वीच सत्तेचा पट रंगला असून भाजपने आखलेली आक्रमक आणि काटेकोर रणनीती इतर पक्षांसाठी डोकेदुखी ठरत आहे. चार विषय समित्यांपैकी तीन सभापती पदे आपल्या ताब्यात ठेवण्याचा निर्धार भाजपने जवळपास निश्चित केल्याची माहिती समोर येत असून उर्वरित एका पदासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष सुरू आहे.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी साधलेला थेट संपर्क आणि झालेली सविस्तर चर्चा ही या संपूर्ण सत्तानाट्याची दिशा ठरवणारी ठरली आहे. जिल्हा परिषदेत भाजपची पकड अधिक भक्कम करण्यासाठी ‘तीन सभापती पदे कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाहीत’ असा स्पष्ट संदेश या बैठकीतून दिला गेल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आधीच उपाध्यक्षपद बहाल करण्यात आले असल्यामुळे त्यांना आणखी सत्तावाटप देण्यास भाजपने नकारात्मक भूमिका घेतल्याचे संकेत मिळत आहेत. तरीही राष्ट्रवादीकडून अतिरिक्त पदासाठी सुरू असलेल्या हालचालींमुळे अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खा. संजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अनपेक्षितपणे भाजपकडे झुकते माप घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकी दरम्यानच काही सदस्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता आणि आता त्याचाच पुढचा टप्पा म्हणून ‘एक सभापती पद’ मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. खा.जाधव आणि पालकमंत्री बोर्डीकर यांच्यातील त्या भेटीमुळे या समीकरणांना अधिक बळ मिळाल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, सुरुवातीला आक्रमक भूमिका घेत बहिष्काराचा मार्ग स्वीकारणारा शिवसेना शिंदे गट आता सत्ता समीकरणात मागे पडू नये, म्हणून सक्रिय झाला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावरून हस्तक्षेप होण्याची शक्यता वर्तवली जात असून, ‘एक पद’ मिळवण्यासाठी पडद्यामागे जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. जिंतूर तालुक्याला अध्यक्षपद मिळाल्यामुळे सभापती पदांचा मान इतर तालुक्यांकडे वळवण्याची रणनीती आखण्यात आली आहे. यामध्ये भाजपच्या निष्ठावान आणि ज्येष्ठ सदस्यांना संधी देण्यावर भर दिला जात असून, त्यामुळे स्थानिक पातळीवरही गटबाजी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. सभापती पदांच्या निवडीबरोबरच विषय समित्यांच्या वाटपावरूनही राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे. उपाध्यक्ष यांना कोणती समिती मिळणार यावरूनही सत्ता संतुलनाचा अंतिम ताळमेळ बसणार आहे.

२ एप्रिल रोजी दुपारी होणारी निवडणूक ही केवळ पदांची निवड न राहता जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय समीकरणांची दिशा ठरवणारी ठरणार आहे. सध्याच्या घडीला भाजपचा आक्रमक डाव, शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि राष्ट्रवादीची महत्त्वाकांक्षा या तिघांच्या संघर्षातून निर्माण होणारे चित्र जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकते. पालकमंत्री बोर्डीकर या रात्री उशीरा परभणीत दाखल होणार असून त्यानंतरच सभापती पद निवडी संदर्भातील हालचाली अंतीम टप्प्यात येतील, अशी चिन्हे असून सभापती निवडी बरोबरच विषय समित्या वाटपाचाही विषय गुरुवारी सकाळपर्यंत मार्गी लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT