पूर्णा : तालुक्यातील झिरोफाटा येथील हायटेक रेसिडेंसीयल स्कुलचे संस्थाचालक पती-पत्नीने केलेल्या मारहाणीत उखळद येथील विद्यार्थीनीचे पालक किर्तनकार प्रवचनकार हभप जगन्नाथ पांडुरंग हेंडगे (वय ४२) यांचा १० जुलै रोजी मृत्यू झाला होता. त्या घटनेला आता तीन दिवस उलटून गेले तरी पूर्णा पोलिसांना या फरार आरोपींना अटक करण्यास यश आले नाही. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने मंगळवारी (दि.१५) जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
परभणी जिल्ह्यातील उखळद येथील जगन्नाथ हेंडगे यांनी आपल्या मुलीचा झिरोफाटा येथील हायटेक रेसिडेन्शियल स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत प्रवेश घेतला होता. मात्र मुलगी निवासी शाळेत राहण्यास इच्छुक नसल्यामुळे त्यांनी १० जुलै रोजी शाळेचा दाखला (टीसी) मागण्यासाठी शाळेत भेट दिली होती. टीसी देण्याऐवजी शाळेच्या संस्थाचालकांनी उर्वरित प्रवेश शुल्काची मागणी करत पालक जगन्नाथ हेंडगे यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना परभणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटना घडल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल होवूनही क्रूरपणे हत्या करणाऱ्या फरार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. याचा संताप व्यक्त करत उखळद येथील ग्रामस्थांनी रविवारी (दि.१३) संयुक्त बैठक घेऊन जगन्नाथ हेंडगे यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी आरोपींना अटक तातडीने अटक करून जगन्नाथ हेंडगे यांना न्याय मिळावा, यासाठी मंगळवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
हायटेक रेसिडेंसीयल स्कुलचे संस्थाचालक पती- पत्नीचा पोलिसांकडून तीन दिवसांपासून शोध सुरू असून हे दोघेही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.