पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा -चुडावा रोडलगत असलेल्या न-हापूर शिवारातील तोडणीला आलेला तीन एकरातील ऊस विद्युत रोहीत्राजवळील तारेची ठिणगी पडून जळून खाक झाला. ही घटना आज (दि.३१) दुपारी १ च्यादरम्यान घडली. चुडावा येथील ऊस उत्पादक शेतक-याचे सुमारे दीडशे टन ऊस जळाल्याने सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, चुडावा येथील शेतकरी गणेशराव साहेबराव देसाई, पंडीत साहेबराव देसाई यांची पूर्णा- चुडावा रोडलगतच न-हापूर शिवारात गट क्रमांक ३२ मध्ये बागायती शेती आहे. तीन एकरात ऊस असून विद्युत रोहीत्राजवळील तारेतून ठिणगी पडून ऊस पाहता पाहता जळून खाक झाला. यात तीन एकरातील सुमारे दीडशे टन उसाचे साडेचार लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्याने चुडावा पोलीस ठाणे व महावितरणचे ग्रामीण अभियंता वसमतकर यांच्याकडे माहिती देत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.