Stray Dogs Attack Deer Fawn
ताडकळस : ताडकळस परिसरात मोकाट कुत्र्यांनी हरणाच्या तीन ते चार महिन्यांच्या पाडसावर हल्ला करून त्याला जखमी केले. मात्र, यावेळी दोन शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत कुत्र्यांना हाकलून लावले. त्यानंतर पशुवैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने जखमी पाडसाला सुरक्षितपणे वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. या तत्परतेमुळे जखमी वन्यजीवाला वेळेवर मदत मिळाली.
मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास ताडकळस परिसरात ही घटना घडली. मोकाट कुत्र्यांनी हरणाच्या पाडसावर हल्ला केल्याने ते जखमी झाले. हा प्रकार लक्षात येताच ताडकळस येथील पोले आणि माठे या दोन शेतकऱ्यांनी धाव घेत कुत्र्यांना हाकलून लावले. त्यानंतर जखमी पाडसाला मदत मिळावी यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
पशुवैद्यकीय विभागाचे राजेश वाघमारे यांच्या मदतीने पाडसाला ताडकळस पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनीही या घटनेची गांभीर्याने दखल घेत वनविभागाशी संपर्क साधला आणि जखमी पाडसाबाबत माहिती दिली.
पोलिसांनी वनविभागाचे खटिंग आणि अंगद आयनले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर खटिंग, अंगद आयनले आणि माणिक इंगोले हे रात्री पावणेबाराच्या सुमारास ताडकळस पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी जखमी हरणाच्या पाडसाला ताब्यात घेतले.
या संपूर्ण प्रक्रियेत पोले आणि माठे या शेतकऱ्यांनी दाखवलेले धाडस, पशुवैद्यकीय विभागाचे राजेश वाघमारे आणि लक्ष्मीकांत जवळेकर यांनी केलेली मदत, तसेच ताडकळस पोलिसांनी वनविभागाशी साधलेला समन्वय महत्त्वपूर्ण ठरला.
संकटात सापडलेल्या वन्यजीवाला मदत करण्यासाठी शेतकरी, पशुवैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे परिसरातून कौतुक होत आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पाडसाला वेळेत मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचविण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करता आले.
दरम्यान, वन्यजीव संकटात सापडल्यास त्यांना त्रास न देता तातडीने वनविभाग किंवा संबंधित प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाचे खटिंग आणि अंगद आयनले यांनी केले आहे.
या वेळी ताडकळस पोलीस ठाण्याचे कर्मचारी विष्णू भोसले, आयनले तसेच पशुवैद्यकीय विभागाचे राजेश वाघमारे यांच्यासह इतर उपस्थित होते.