गंगाखेड : यंदाही ऊसतोडीसाठी कारखान्यावर जायचे असल्याचे सांगून किराणा सामान व कपडे देण्याचे आमिष दाखवत घरात एकटी असलेल्या २५ वर्षीय ऊसतोड मजूर महिलेवर जबरदस्ती केल्याचा आरोप ऊसतोड मुकादमावर करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून बबन सातपुते (रा. येल्डा, ता. अंबाजोगाई) याच्याविरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यात बलात्कारासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये ऊसतोडणीसाठी पीडित महिलेच्या पतीने आरोपीच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर काम करण्यासाठी पंचमीच्या सणाच्या वेळी दीड लाख रुपये उचल घेतली होती. त्यानंतर या दाम्पत्याने लातूर जिल्ह्यात सुमारे पाच महिने ऊसतोडणीचे काम केले. ऊसाचा पट्टा संपल्यानंतर आरोपीने त्यांना ट्रॅक्टरने येल्डा येथे आणले. त्यावेळी त्यांच्याकडे अद्याप ८० हजार रुपये बाकी असल्याचे सांगत आरोपीने बाजारासाठी दहा हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र, पीडितेच्या पतीने पैसे घेण्यास नकार दिला.
यानंतर आरोपीने दोघांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी ऑटोत बसवून दिले. काही कालावधीनंतर आरोपी दोन वेळा पीडितेच्या घरी गेला. मात्र, त्यावेळी घरात सासू-सासरे आणि पती असल्याने तो तेथून निघून गेला. दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी सकाळी पीडितेच्या पतीने किराणा सामानासाठी दोन हजार रुपयांची मागणी करण्यासाठी आरोपीला फोन केला. त्यावर आरोपीने गंगाखेड येथील ग्राहक सेवा केंद्रातून पैसे काढून घेण्यास सांगितले. त्यामुळे पीडितेचा पती पैसे काढण्यासाठी गंगाखेडला आला. त्यावेळी सासू-सासरेही बाहेरगावी गेले होते, तर मोठा मुलगा घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. घरात पीडित महिला आणि तिचे चार महिन्यांचे बाळ होते.
दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास आरोपी मोटारसायकलवरून तिच्या घरी आला. यंदाही ऊसतोडीसाठी कारखान्यावर जायचे असून, किराणा सामान भरून देतो तसेच अंबाजोगाईला आल्यानंतर कपडे घेऊन देतो, असे सांगून त्याने महिलेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बाळ रडू लागल्याने महिला बाळाकडे जात असताना आरोपीने मागून पकडून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचे तोंड दाबून धरले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपी निघून गेल्यानंतर पीडित महिलेने शेजारील महिलेला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पतीसह गंगाखेड पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून बबन सातपुते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव सानप करीत आहेत.