परभणी

Parbhani Sugarcane Fire : दुष्काळात तेरावा महिना; शॉर्टसर्किटमुळे पाच एकर ऊस जळून खाक

परभणी तालुक्यातील ठोळा शिवारातील घटना; महावितरणच्या कारभारावर शेतकऱ्यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

परभणी : एकीकडे दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. परभणी तालुक्यातील ठोळा शिवारात शेतातून गेलेल्या विजेच्या तारा एकमेकांना भिडल्याने उडालेल्या ठिणग्यांमुळे शेतातील उभ्या उसाला भीषण आग लागली. या आगीत रामदास देविदास खोंड आणि लक्ष्मण देविदास खोंड या दोन बंधूंचा तोडणीस आलेला सुमारे चार ते पाच एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

शेतातून गेलेल्या वीजवाहिन्यांच्या तारा एकमेकांना घासल्याने ठिणग्या उडाल्या आणि त्यातून उसाच्या शेताला आग लागल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने तोडणीस आलेला संपूर्ण ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

या दुर्घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दुष्काळामुळे आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर या घटनेमुळे मोठे संकट उभे राहिले आहे. वीजवाहिन्यांच्या देखभालीअभावी ही दुर्घटना घडल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला असून, या प्रकरणी महावितरणने जबाबदारी निश्चित करून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जळालेल्या उसाचा तातडीने पंचनामा करून शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT