परभणी : साडेगाव येथील शेतकऱ्याने व्यापाऱ्यास विकलेल्या सोयाबीनच्या मालापोटी दिलेला दोन लाख रुपयांचा धनादेश अपुऱ्या रकमेअभावी अनादरित झाल्याप्रकरणी मुख्य सत्र न्यायाधीश एम.एम. वर्मा यांनी आरोपी व्यापारी नागेश शेषराव देवडे यास दोषी ठरविले. न्यायालयाने त्यास एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावतानाच शेतकऱ्यास चार लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.
साडेगाव येथील शेतकरी जायकोजी हरणाची व्यवहारे यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये आपल्या शेतातील ३१ क्विंटल सोयाबीन व्यापारी नागेश शेषराव देवडे यांच्या श्रीकृष्ण सेवा केंद्रावर विकले होते. या मालाच्या मोबदल्यापोटी व्यापारी देवडे यांनी शेतकरी व्यवहारे यांना १ हजार ५०० रुपये रोख दिले, तर उर्वरित दोन लाख रुपयांसाठी धनादेश दिला.
सदर धनादेश शेतकऱ्याने बँकेत जमा केला असता, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो अनादरित होऊन परत आला. त्यानंतर शेतकरी व्यवहारे यांच्या वतीने ॲड. सुनील सावरगावकर यांनी व्यापाऱ्यास कायदेशीर नोटीस बजावली. त्यानंतर धनादेश अनादराच्या कलमान्वयेे न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मूळ धनादेश, बँकेचा मेमो, खरेदी बिल, शेतीचा सातबारा यांसह विविध कागदपत्रे व पुरावे तपासले. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुख्य सत्र न्यायाधीश एम. एम. वर्मा यांनी ७ ऑगस्ट आरोपी नागेश शेषराव देवडे यास दोषी ठरविले.
त्यानंतर शिक्षेच्या आदेशात न्यायालयाने धनादेशाच्या दुप्पट म्हणजे चार लाख रुपये शेतकऱ्यास नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. तसेच आरोपीस एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात फिर्यादी शेतकरी व्यवहारे यांची बाजू ॲड. सुनील सावरगावकर यांनी मांडली. त्यांना ॲड. शैलेश झोडपे व ॲड. आकाश देशमुख यांनी सहकार्य केले.