Parbhani MSEDCL Technician Assault
सोनपेठ : नवीन रोहित्र बसविण्याचे काम सुरू असताना वीजपुरवठा बंद केल्याच्या कारणावरून महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना महातपुरी येथे घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महातपुरी ग्रामपंचायतीजवळील मध्यवर्ती सहकारी बँकेलगतच्या रस्त्यावर घडली.
कोडिबा राम मुलगीर हे महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ असून, महातपुरी येथे नवीन रोहित्र बसविण्याचे काम सुरू होते. कामाच्या अनुषंगाने वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. याचा राग मनात धरून आरोपींनी मुलगीर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच गावात काम करण्यास मनाई करत धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मुलगीर हे रोहित्राचे साहित्य आणण्यासाठी महातपुरी बसस्थानकाजवळ दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांची दुचाकी अडवून त्यांना थांबविले. त्यानंतर पुन्हा वीजपुरवठा बंद केल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी शेख उमर शेख राजू, शेख समीर शेख जमील आणि शेख राजू शेख युसूफ यांच्याविरुद्ध सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक बळीराम मुंडे करीत आहेत.