Sonpeth Nagar Parishad Committee Election
सोनपेठ : सोनपेठ नगर परिषदेच्या विविध समित्यांच्या सभापतींच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि. 23) नगर परिषद सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पीठासीन अधिकारी म्हणून डॉ. रतनसिंग साळोख होते. यावेळी निवड झालेल्या चारही समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व झाले आहे.
सोनपेठ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले होते, तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडली होती. या निवडणुकीत आ. राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने 12 जागांवर विजय मिळवत बहुमत सिद्ध केले होते. जनसुराज्य शक्ती पार्टीचे परमेश्वर कदम हे नगराध्यक्षपदी निवडून आले असून त्यांच्या पक्षाचे आठ नगरसेवक निवडून आले आहेत.
आज नगर परिषदेच्या विविध समित्यांच्या निवडीसाठी आयोजित बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत खालीलप्रमाणे सभापतींची निवड करण्यात आली यामध्ये महिला व बालकल्याण समिती सृष्टी सचिन मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस), बांधकाम समिती निलेश चंद्रकांत राठोड (उपनगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), नियोजन व विकास समिती बळीराम महादेव काटे (राष्ट्रवादी काँग्रेस), स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती शेख शबाना मुस्तफा (राष्ट्रवादी काँग्रेस) यांची निवड झाली आहे. सर्व समित्यांच्या सभापतीपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात 12 विरुद्ध 9 अशा मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला. दरम्यान, स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांची निवड करण्यात आली.
या बैठकीतील कार्यालयीन कामकाज मुख्याधिकारी युवराज पोळ, एम. एन. खान आणि धम्मपाल किरवले यांनी पाहिले. समित्यांच्या निवडीतून नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.