Sunita Dhole allegations
सेलू : शहरातील गायत्री नगर खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी माझे पती विष्णू ढोले यांना नियोजितपणे खोट्या गुन्ह्यात अडकवले, असा गंभीर आरोप अॅड. सुनिता ढोले यांनी शनिवारी (दि. २५ ) पत्रकार परिषदेत केला. यावेळी अॅड. प्रशांत ढोले उपस्थित होते.
सुनिता ढोले यांनी सांगितले की, खून प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याची माहिती पोलिसांना असूनही त्याला अटक करण्यात आलेली नाही. उलट आरोपीला संरक्षण दिले जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. माझे पती विष्णू ढोले हे वारंवार पोलिसांकडे तपासाबाबत विचारणा करत होते, याच कारणावरून त्यांच्यावर राजकीय दबावातून विनाकारण कलम १०९(१) तसेच शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणात पोलिसांकडे ठोस पुरावे नसल्याचेही त्यांनी नमूद केले. घटनेच्या ठिकाणाबाबतही पोलिसांच्या नोंदीत विसंगती असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार घटना उपजिल्हा रुग्णालयाच्या आत घडल्याचे सांगितले जात असताना एफआयआरमध्ये बाहेरील मेन गेटचा उल्लेख असल्याने शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे घटनेच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
या संदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पतीला विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती संबंधित यंत्रणेला देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गायत्री नगर खून प्रकरणातील मुख्य आरोपीला तातडीने अटक करावी आणि विष्णू ढोले यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा, अन्यथा सामाजिक संघटनांच्या मदतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सुनिता ढोले यांनी दिला.
या घटनेत आदित्य प्रधान यांचा मृत्यू झाला असून आनंद ढोले गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, मृताच्या कुटुंबीयांना अद्याप सामाजिक संघटना किंवा लोकप्रतिनिधींनी भेट दिली नसल्याची खंतही सुनिता ढोले यांनी यावेळी व्यक्त केली.