Cheque Bounce Case  pudhari photo
परभणी

Parbhani Court News | धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला दोन महिन्यांची शिक्षा: सेलू न्यायालयाचा निर्णय

धनादेशाच्या दुप्पट रकमेची भरपाई करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

Cheque Bounce Case Selu

सेलू : धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणातील दोन स्वतंत्र खटल्यांमध्ये सेलू येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. संबंधित धनादेशाच्या दुप्पट रकमेची नुकसानभरपाई फिर्यादीला एका महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गौरव अ. तराळ यांनी २२ जुलैरोजी दिला.

प्रकरणानुसार, भिकमचंद श्रीमल गादिया यांना हिरा टिकमचंद परदेशी यांनी हातउसने घेतलेल्या ५० हजार रुपयांच्या परतफेडीसाठी ४० हजार व १० हजार रुपयांचे असे दोन धनादेश दिले होते. मात्र, आरोपीच्या खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने दोन्ही धनादेश बँकेकडून अनादरित झाले.

यानंतर फिर्यादी भिकमचंद गादिया यांनी १७ नोव्हेंबर २०१६ रोजी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स (एन.आय.) कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत एस.एस.सी. क्र. २५३/२०१६ व एस.एस.सी. क्र. २५४/२०१६ या दोन स्वतंत्र प्रकरणांद्वारे सेलू न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.

सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांचा साक्षीपुरावा व युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद केले. त्यानुसार, ४० हजार रुपयांच्या धनादेशासंदर्भातील प्रकरणात आरोपीला ८० हजार रुपयांची नुकसानभरपाई एका महिन्याच्या आत फिर्यादीला अदा करण्याचे आदेश देण्यात आले. ही रक्कम न भरल्यास एक महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागणार आहे.

तसेच, १० हजार रुपयांच्या धनादेशासंदर्भातील दुसऱ्या प्रकरणात आरोपीला २० हजार रुपयांची नुकसानभरपाई एका महिन्यात अदा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणातही रक्कम न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त साध्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय, दोन्ही प्रकरणांत आरोपीला प्रत्येकी दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फिर्यादी भिकमचंद श्रीमल गादिया यांच्यावतीने ॲड. एल. एच. खोना यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT