परभणी : तालुक्यातील सहजपूर जवळा येथील ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या प्रशासन व पोलिसांच्या बळाला कडवा विरोध करत निकराची झुंज दिली होती. दुपारनंतर पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करत शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीचा सोपस्कार पार पाडला होता. शुक्रवारी पोलिसांनी केलेल्या दंडेलशाहीनंतर ग्रामस्थांत भीतीचे वातावरण असले तरी सहजपूर जवळा ग्रामस्थांचा लढण्याचा निर्धार मात्र कायम असल्याचे शनिवारी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी ठासून सांगितले.
तालुक्यातील जवळपास 700 च्या घरात लोकसंख्या असलेले सहजपूर जवळा गाव शुक्रवारी शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला केलेल्या तीव्र विरोधानंतर राज्यभर चर्चेत आले. जिल्ह्यातील दिड हजार एकर जमीन शक्तिपीठ मार्गासाठी संपादीत करण्यात येणार आहे. त्यात सहजपूर जवळा गावातील 26 हेक्टर 94 गुंठे जमीन शक्तिपीठ मार्गासाठी जाणार आहे. यामुळे जवळपास 50 टक्के शेतकरी भूमिहीन होणार आहेत.
ज्या जमिनीच्या तुकड्यावर आयुष्याची गुजरान केली, त्ाो काळजाच्या तुकड्यागत असलेला जमिनीचा तुकडा गेला तर खायचे तरी काय? अशी अस्वस्थता ग्रामस्थात होती, याच अस्वस्थतेचे दर्शन सहजपूर जवळा ग्रामस्थांनी मोजणीसाठी आलेल्या पथकासोबत निकराची झुंज देवून दाखवून दिले. 700 च्या घरात लोकसंख्या असलेल्या गावात प्रशासनाने जवळपास दीड हजार पोलिस पाठवून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ग्रामस्थ पोलिसांच्या दडपशाहीपुढे नरमले नाही.
आंदोलना दरम्यान स्थानबध्द करण्यात आलेल्या महिला शेतकरी व पुरुषांची शुक्रवारी सायंकाळी सुटका करण्यात आली. तदनंतर प्रशासनाच्या वतीने जमीन मोजणी करून केलेल्या खुणा ग्रामस्थांनी उपटून टाकल्या आहेत. शनिवारी सकाळी सहजपूर जवळा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविणारे सतिश घाटगे, ॲड.माधुरी क्षीरसागर, रामप्रसाद गमे, प्रसाद गरूड या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत ग्रामस्थांनी लढण्याचा निर्धार व्यक्त करत कुठल्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.
आज सावली विश्रामगृहावर बैठक
जिल्ह्यातील शक्तिपीठ बाधित गावातील शेतकरी व शक्त्ािपीठ विरोधी संघटना, विविध राजकीय पक्षांची बैठक रविवारी शहरातील सावली विश्रामगृहावर दुपारी 12 वाजता होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी दिली. या बैठकीत शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी विचारविनिमय करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.