financial scam | Pudhari Photo
परभणी

Parbhani Financial Scam: परभणीत एक हजाराच्या आमिषातून सुमारे 7 कोटींचा आर्थिक घोटाळा

आठ नागरिकांच्या खात्यांतून कोट्यवधींचे व्यवहार; आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

परभणी: शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आणि बँक खाते उघडताच एक हजार रोख देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती उघडण्यात आली. त्यानंतर संबंधित खातेदारांच्या नकळत त्यांच्या खात्यांचा गैरवापर करून सुमारे 7 कोटींचे संशयास्पद आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार परभणीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू आहे.

तक्रारदार प्रशांत गौतम नरवाडे (रा. पंचशील नगर, परभणी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा परिचित असलेला ऑटोचालक अविनाश आव्हाड याने बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्टेशन रोडवरील शाखेत खाते उघडल्यास विविध शासकीय योजनांचा लाभ मिळेल तसेच तत्काळ 1,000 रोख मिळतील, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून नरवाडे यांनी खाते उघडले.

खाते सुरू झाल्यानंतर त्यांना 1,000 देण्यात आले. मात्र, एटीएम कार्ड, पासबुक, बँकिंग किट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे आव्हाड याने स्वतःकडेच ठेवून घेतल्याचा आरोप आहे. यामुळे नरवाडे यांनी आपल्या आई, पत्नी आणि शेजाऱ्यांसह आणखी सात जणांची खातीही त्याच शाखेत उघडून दिली. सर्वांनाच प्रत्येकी 1,000 देण्यात आले; मात्र सर्व खात्यांवरील नियंत्रण आरोपीकडेच राहिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

बँकेच्या नोटिशीनंतर उघडकीस आला प्रकार

काही महिन्यांनंतर ५ फेब्रुवारी रोजी प्रशांत नरवाडे यांच्या आईला बँक ऑफ महाराष्ट्रकडून 99 हजारांच्या सायबर फसवणुकीसंदर्भात नोटीस मिळाली. त्यानंतर संबंधित खातेदारांनी बँकेत चौकशी केली असता त्यांच्या खात्यांमधून लाखो ते कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे समोर आले. ही माहिती मिळताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली.

त्यानंतर खातेदारांनी अविनाश आव्हाड याच्याकडे जाब विचारला असता, "घाबरू नका, सर्व व्यवहार सेटल करून देतो," असे सांगून त्याने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचा तपास वेगात

फसवणुकीची खात्री पटताच पीडितांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. प्राथमिक चौकशीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी अविनाश आव्हाड आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संजय निकुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सायबर फसवणूक की मनी लॉन्डरिंग?

या व्यवहारांचा संबंध सायबर फसवणूक, मनी लॉन्डरिंग किंवा अन्य आर्थिक गुन्ह्यांशी आहे का, याचाही तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, व्यवहारासाठी वापरण्यात आलेली रक्कम कुठून आली, ती कोणाकडे वळविण्यात आली आणि या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचाही शोध पोलीस घेत आहेत. तपास पुढे सरकल्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT