Charthana Police Robbery Accused Arrested Pudhari
परभणी

Parbhani Crime | नऊ वर्षांपासून फरार दरोड्यातील आरोपीला अटक; चारठाणा पोलिसांची कारवाई

गुप्त माहितीच्या आधारे बुलढाण्यातील कुंडलस येथे सापळा रचून घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Charthana Police Robbery Accused Arrested

चारठाणा : रस्त्यावर अडवून दरोडा टाकल्याच्या गुन्ह्यात तब्बल नऊ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर चारठाणा पोलिसांनी अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील कुंडलस येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. शहाजी नानासाहेब भोसले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सन २०१८ मध्ये खैरी पाटीजवळ सात ते आठ जणांच्या टोळक्याने रस्ता अडवून दरोडा टाकला होता. या घटनेप्रकरणी चारठाणा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्यावेळी पोलिसांनी दरोड्यात सहभागी असलेल्या सहा ते सात आरोपींना अटक केली होती. मात्र, शहाजी नानासाहेब भोसले हा पोलिसांना गुंगारा देत तेव्हापासून फरार होता. पोलिसांकडून त्याचा सातत्याने शोध घेण्यात येत होता; परंतु तो हाती लागत नव्हता.

दरम्यान, फरार आरोपी शहाजी भोसले हा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील कुंडलस येथे असल्याची गोपनीय माहिती चारठाणा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ आणि पोलीस जमादार उद्धव सातपुते यांनी १८ नोव्हेंबर रोजी कुंडलस येथे जाऊन सापळा रचला. यावेळी शहाजी भोसले याला शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तब्बल नऊ वर्षांपासून फरार असलेल्या दरोड्यातील आरोपीला पकडण्यात चारठाणा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT