Parbhani accident 
परभणी

Parbhani accident: काळ आला होता, पण वेळ नाही! सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रसंगसावधतेने वाचले रोडवरील अपघातग्रस्त युवकाचे प्राण

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा : पूर्णा ते नांदेड या मुख्य रोडवर सोमवारी (दि.१) रात्री ७:३० वाजेच्या दरम्यान मोटारसायकल अपघात झाला होता. या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला. त्याच्या डोकं आणि डोळ्याभोवती मार लागल्याने तो रक्ताबंबाळ अवस्थेत रस्तालगत पडला होता. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवून अपघातस्थळी अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता.

सदर युवक जखमी स्थितीत तडफडत असताना या क्षणाला नांदेडहून पूर्णेकडे येणारे सामाजिक कार्यकर्ते प्रदिप नन्नवरे यांना हा प्रकार दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमी युवकाची गंभीर परिस्थिती पाहून तात्काळ त्याला एका खाजगी रुग्णवाहिका चालकास संपर्क करुन बोलावून घेतले. त्यानंतर जखमी युवकावर तात्काळ पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तो स्थिर झाल्यावर जखमींची ओळख पटवून त्यांच्या नातेवाईकास बोलावून पुढील उपचारासाठी नांदेड येथील यशोसाई दवाखान्यात दाखल केले. एतक्या गंभीर जखमी अवस्थेतील युवकाचे प्राण वाचल्याने त्याचा काळ आला होता, पण वेळ नाही.

जखमी झालेला युवक हा पूर्णा तालूक्यातील पिंपळगाव लिखा येथील असून, त्याचे नाव राजेश चंद्रकांत किरगे (वय-२८ वर्ष) आहे. तो पूर्णा येथील एका दुकानात मेकॅनिकलचे काम करुन गावाकडे जात असताना त्याचा गौर रोडवर भवरे ढाब्यासमोर दुचाकीवरुन पडून अपघात घडला.

दरम्यान, त्यास सामाजिक कार्यकर्ते प्रदिप नन्नवरे यांनी तत्परता दाखवून उपचारार्थ दाखल करुन सदर युवकाचे प्राण वाचवले. या कामी त्याचेसोबत असलेले संदिप गायकवाड, राजकुमार वावळे, कैलाश ढेंबरे, रुग्णवाहिका चालक पवण दवणे यांचे सहकार्य लाभले. आता जखमी युवक यशोसाई रुग्णालयात सुखरुप असल्याचे त्याचे वडील चंद्रकांत किरगे यांनी दै पुढारीशी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT