मानवत : राज्य शासनाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यामार्फत शासन निर्णय काढून राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाची नावे बदलण्यास मान्यता दिली. त्यानुसार परभणीच्या ७ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण शासनाने केले आहे.
राज्य शासनाने १५ जानेवारी २०२५ रोजी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यामार्फत शासन निर्णय काढत राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत या संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. अशा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा मुख्य उद्देश हा युवकांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवणे व खाजगी औद्योगिक आस्थापनांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळांचा पुरवठा करणे असा आहे.
राज्यात ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ५८५ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. ८ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने राज्यातील या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नावे बदलण्याचा विचार केला होता. याच अनुषंगाने १५ जानेवारी २०२५ रोजी शासन निर्णयाद्वारे राज्यातील १३२ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत मोतीराम महाराज यांचे नाव देण्यात आले. पूर्णा तालुक्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला कृषिभूषण स्वर्गीय अॅड. गंगाधर पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नाव देण्यात आले. मानवत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला दिव्यचैतन्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नाव देण्यात आले.
परभणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला गोंधळ महर्षी राजारामबापू कदम औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे तर पाथरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला स्वातंत्र्यसैनिक दिगंबरराव चौधरी भारसावडाकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नाव देण्यात आले आहे. सेलू येथील शासकीय प्रशिक्षण संस्थेस महर्षी वाल्मिकी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नाव देण्यात आले. तर सोनपेठ शासकीय औद्योगिक प्रेक्षण संस्थेला मच्छिंद्रनाथ महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोनपेठ असे नाव देण्यात आले आहे. एकंदरीतच जिल्ह्यातील ७ औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचे नामकरण करताना शासनाने त्या त्या तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक, संत महात्मा किंवा कृषीभूषण अशा सन्मानित व्यक्तींचे नाव देऊन एक प्रकारे त्यांचा सन्मानच केला असल्याचे बोलले जात आहे.