पाथरी : पाथरी शहरातील नगर परिषदेच्या स्वच्छतागृहात मृतदेह आणून टाकल्याची घटना उघड झाली होती. या प्रकरणी तीन आरोपींवर मंगळवारी गुन्हा दाखल झाला. मयताचे पोस्टमार्टम बुधवारी करण्यात आले, मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्याच्या समोर घेऊन येत आरोपीला अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत अशी भूमिका घेतली होती. आरोपींना 24 तासाच्या आत अटक करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मयताचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी देण्यात आले.
पाथरी येथील शिक्षक कॉलनीतील अनंता हरिभाऊ टोम्पे (वय 35) हे मानवत येथील बिहार कॉलनी येथे राहत होते. 14 एप्रिल रोजी दुपारी 2 .30 च्या सुमारास त्यांना त्यांच्या मानवत येथील राहत्या घरातून पैसे परत दिले नाही या कारणावरून आरोपी घरातून बोलावून बाहेर घेऊन गेले. त्यांना बेदम मारहाण करून जीवे मारून मृतदेह नगर परिषदेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात आणून टाकला. हा प्रकार 15 एप्रिल रोजी दुपारी 2 च्या सुमारास उघडकीस आला होता. त्या नंतर मयत अनंता टोम्पे यांच्या पत्नी रुपाली टोम्पे यांच्या फिर्यादी वरून भारत वाव्हळे , राहुल शिंदे ,अशोक खंडागळे या तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, बुधवारी परभणी येथील फॉरेन्सिक लॅब मध्ये मयताचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी परभणी येथून प्रेत थेट पाथरी पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवत आरोपीला अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत अशी भूमिका घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी आरोपींना 24 तासाच्या आत अटक करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच एका आरोपीला अटक करण्यात आली असल्याचे सांगितले.