मानवत : तालुक्यातील रत्नापूर शिवारातील सोलार प्लांटला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करत सुमारे ६५ हजार रुपयांचे केबल आणि इतर साहित्य चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मानवत पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नापूर शिवारातील सोलार प्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी सुरक्षा पर्यवेक्षक गणेश सुदाम सलगर (रा. नारायणनगर, मानवत) यांच्याकडे आहे. १३ एप्रिलच्या रात्रीपासून १४ एप्रिलच्या सकाळपर्यंत सलगर आपल्या सहकाऱ्यांसह कर्तव्यावर होते.
पहाटेच्या वेळी गस्त घालून सकाळी जेव्हा परिसरात पाहणी करण्यात आली, तेव्हा प्लांटच्या दक्षिण बाजूचे तारांचे कुंपण कापून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे दिसून आले. चोरट्यांनी सोलार प्लेटखालील सुमारे ५ हजार मीटर स्ट्रिंग केबल आणि १ हजार 'वाय' (Y) कनेक्टर लंपास केले आहेत. चोरीस गेलेल्या साहित्याची एकूण किंमत ६५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मानवत पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.
ग्रामीण भागातील सोलार प्रकल्पांना वारंवार चोरट्यांचे लक्ष्य केले जात आहे. या घटनेनंतर प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेली यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून आणि कंपनी प्रशासनाकडून जोर धरू लागली आहे.