गंगाखेड: तालुक्यातील उखळी खुर्द गावात मंगळवारी (दि.१६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला. अवकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे व नाले भरून वाहू लागले आणि काही मिनिटांतच गावात मोठा पूर आला.
या अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात शेतकरी वसंत एकनाथ गुट्टे यांचे दोन चांगले, मजबूत बैल वाहून गेले. सायंकाळी वाहून गेलेले बैल दुसऱ्या दिवशी सकाळी एक किलोमीटर अंतरावर ओढ्यात सापडले. प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी बैलांचे पंचनामे केले असून, त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यासाठी बैल म्हणजे केवळ जनावर नसतात; तर नांगरणीपासून पेरणी आणि कापणीपर्यंत खरे कामाचे सोबती असतात. गुट्टे कुटुंबाच्या श्रमाचे दोन आधारवड क्षणार्धात हिरावून गेल्याने गाव शोकमग्न झाले आहे. शेतकऱ्याचे बैल गेले म्हणजे जणू घरातील दोन कर्ते पुरुषच हरपले,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. हा प्रसंग केवळ आर्थिक तोटा नसून शेतकऱ्याच्या मनावर झालेला खोल आघात असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे गुट्टे कुटुंब मोठ्या संकटात सापडले असून शेतीकामासाठी ते असहाय झाले आहेत. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, माखणी महसूल मंडळ असलेल्या उखळी खुर्द हे गाव माखणी गावापासून अंतरावर असल्याने येथे पर्जन्यमापक यंत्र नसल्याने पावसाची नोंद शासन दरबारी होत नसल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला. पावसाचे योग्य मोजमाप होत नसल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्यात अडचणी येत असल्याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.