पूर्णा: तालुका परिसरात मागील आठवडाभरापासून मोठ्या प्रमाणात ढगफुटीसदृष्य अतिवृष्टी सरू आहे. शेतशिवारं पुराच्या पाण्यामुळे जलमय झालेली आहेत. दरम्यान, गोदावरी नदीपात्रातील पुराच्या पाण्याने आता धोक्याची पातळी ओलांडली असून धानोरा काळे येथील पुलावरुन पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कधी नव्हे तो पूर्णा ते ताडकळस मार्ग पालम रस्ता बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
येथील गोदावरी नदीवर असलेल्या जुन्या पुलालगत उच्च पातळी नवीन पुल बांधकाम हे शिवलिंग पाटील या ठेकेदाराने मागील तीन वर्षाखाली केले आहे. परंतु. त्या पुलाच्या दोन्ही दक्षिण -उत्तर बाजूचे बांधकाम अद्याप रखडले आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी सज्ज न राहता एक शोभेची वस्तू बनला आहे. तेथील दोन्ही बाजूंचे कठडे भराव भरुन बांधकाम करण्यासाठी जागेचा अडसर येत असल्याचे सांगण्यात येते. हा वाद मागील तीन वर्षांपासून मिटवला नसल्यामुळे पूलाचे काम रखडले आहे. यासाठी कोणीही पुढाकार घ्यायला तयार नाही. परिणामी, पुराच्या पाण्यामुळे जुन्या पुलावरुन आता पाणी वाहू लागले आहे. येथील गोदावरी नदीपात्रात पावसाच्या पुराचे आणि धरणातून सोडलेले पाण्यामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी धोक्याची पातळी ओलांडून नदीकाठच्या गावात आणि पिकात शिरुन नुकसान होत आहे.
दरम्यान मंगळवारी (दि.१६) सायंकाळी अचानक ढगफुटी सदृष्य मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शिवारातील नदीनाल्यांना मोठा पूर येवून परिसरात हाहाकार उडाला होता. संपूर्ण खरीप पिके पाण्याखाली जावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दररोजच पडत असलेल्या पावसामुळे शेतशिवारातून पाणीच पाणी वाहत आहे. त्यामुळे अखाड्यावर बांधलेल्या जनावरांचे गोठ्यातील चिखलामुळे मोठे हाल होत आहेत. चारा घेता येत नसल्यामुळे आणि तो खाता येत नसल्याने पशुपालक शेतकरी हैराण झाले आहेत.